निवडणूक आयोगाने फॉर्म ६ मध्ये बदल केला आणि भाजपाला धार्जिणी भूमिका घेतली असं म्हणत राहुल गांधींनी आरोप केला होता. मात्र निवडणूक आयोगाने एक पोस्ट करत हा आरोप फेटाळून लावला आहे. तसंच फॉर्म ६ मध्ये साधा स्वल्पविराम किंवा पूर्णविरामही बदलला नाही असंही आयोगाने म्हटलं आहे. SIR च्या दरम्यान फॉर्म ६ सह एक अतिरिक्त घोषणापत्र जोडण्यात आलं होतं असं आयोगाने म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाने काय म्हटलं आहे?

निवडणूक आयोगाने हे स्पष्ट केलं आहे की गेल्या वर्षी बिहार SIR च्या दरम्यान एक प्रोटोकॉल तयार करण्यात आला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी घेत असा निकाल दिला की सदर प्रोटोकॉल निवडणूक आयोगाच्या घटनात्मक अधिकारांच्या कक्षेत होता. हे सांगत राहुल गांधींच्या पोस्टमधला आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या पोस्टमधील विधान दिशाभूल करणारं असल्याचंही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

२४ जून २०२५ चा आदेश एकमताने मंजूर

निवडणूक आयोगाने असंही म्हटलं आहे की बिहारच्या SIR साठी २४ जून २०२५ ला जारी केलेला आदेश हा निवडणूक आयोगाच्या एकमताने मंजूर करण्यात आला होता. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने २७ मे २०२६ च्या निकालात हा आदेश कामय ठेवला आहे. २६ सप्टेंबर २०२६ च्या प्रसिद्धी पत्रकातील क्रमांक १२० मधील पोटमुद्दा १ मध्ये आम्ही म्हटलं आहे की एसआयआरसाठीच्या फॉर्म ६ सह जोडलेलं घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलं आहे. एवढंच नाही तर SIR च्या अर्जात स्वल्पविराम किंवा पूर्णविरामही बदलण्यात आलेला नाही. हे आहे त्याचं फॅक्ट चेक असं म्हणतच राहुल गांधी यांच्या पोस्टला उत्तर देणारी पोस्ट निवडणूक आयोगाने केली आहे.

राहुल गांधी यांची पोस्ट काय?

राहुल गांधी पोस्टमध्ये म्हणाले, आता यात कुठलाही संशय उरलेला नाही की ज्ञानेश कुमार यांनी फॉर्म ६ चा वापर बेकायदेशीर पद्धतीने केला. त्यांनी एकतर्फी आणि भाजपाला धार्जिणे असणारे बदल केले आहेत. तसंच ज्ञानेश कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त या पदाचा गैरवापरही केला. भाजपाला त्यांनी सरळसरळ मदत केली आहे हे आता समोर आलं आहे. याचा आता आणखी काय पुरावा पाहिजे? या प्रकरणात जे जे लोक सहभागी आहेत त्यांनी लोकशाहीवर केलेला हा हल्ला आहे. या आशयाची पोस्ट विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लिहिली आहे.