पंजाबमध्ये मतदानाची तारीख पुढे ढकलली; १४ फेब्रुवारी ऐवजी ‘या’ तारखेला होणार मतदान

राज्य सरकार आणि विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याची केलेली विनंती स्वीकारत निवडणूक आयोगाने नवीन तारीख दिली आहे.

(प्रातिनिधीक छायाचित्र)

पंजाब विधानसभा निवडणुकांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. परंतु पंजाब सरकारच्या विनंतीवरून निवडणूक आयोगाने आता राज्यात २० फेब्रुवारीला मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार आणि विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती, ती विनंती स्वीकारत निवडणूक आयोगाने नवीन तारीख दिली आहे. विशेष म्हणजे पंजाबमधील सर्व ११७ जागांसाठी १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार होते, ते मतदान आता २० तारखेला होईल.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून गुरु रविदास जयंतीनिमित्त १४ फेब्रुवारीच्या विधानसभा निवडणुका किमान सहा दिवस पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. मतदानाच्या दोन दिवसांनी १६ फेब्रुवारीला रविदास जयंती आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रात लिहिले होते की, की पंजाबच्या ३२ टक्के लोकसंख्येचा समावेश असलेल्या अनुसूचित जाती समुदायाच्या प्रतिनिधींनी त्यांना सांगितले होते की रविदास जयंतीनिमित्त १० ते १६ फेब्रुवारी रोजी समुदायातील लोक मोठ्या संख्येने वाराणसीला भेट देतात. अशा परिस्थितीत संविधानिक अधिकार असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांना मतदान करता येणार नाही.

याशिवाय भाजपा आणि त्यांचा मित्रपक्ष असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेसनेही निवडणूक आयोगाला पत्र लिहून पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाला पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते. पंजाब भाजपाचे सरचिटणीस सुभाष शर्मा यांनी रविवारी मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, “राज्यात गुरु रविदासजींचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत, ज्यात अनुसूचित जाती समुदायाचा समावेश आहे, जे लोकसंख्येच्या सुमारे ३२ टक्के आहे. या पवित्र प्रसंगी लाखो लोक उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे गुरपर्व ​​साजरे करण्यासाठी जातील. त्यामुळे त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे शक्य होणार नाही.” अशीच विनंती आपच्या पंजाब युनिटचे प्रमुख भगवंत मान यांनीही निवडणूक आयोगाकडे केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Election commission shifts polling date for punjab election to february 20 hrc

Next Story
Goa Election: रडगाणं बंद करा, तुम्ही तर भाजपाचे…; केजरीवालांचा चिदंबरमना टोला
फोटो गॅलरी