नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील कथित गैरप्रकारासंदर्भात गाऱ्हाणे मांडायला गेलेल्या तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळाला केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी, ‘चालते व्हा’, अशा शब्दांत फर्मावल्याचा दावा पक्षाचे राज्यसभेतील खासदार डेरेक ओब्रायन यांनी केला. मात्र, बैठकीमध्ये सभ्यता बाळगण्याची सूचना केल्याचा प्रतिदावा करत ओब्रायन यांचे आरोप आयोगाने फेटाळले. दोघांकडूनही परस्पर विरोधी दावे केले जात असले तरी बुधवारी झालेल्या प्रचंड वादग्रस्त बैठकीनंतर नवा राजकीय वाद उफाळून आला आहे.
राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पश्चिम बंगालमधील मतदारयाद्या, निवडणुकीतील निष्पक्षता आणि निवडणूक व्यवस्थापन यासंदर्भात तक्रार करण्यासाठी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची बुधवारी आयोगाच्या दिल्लीतील मुख्यालयात भेट घेतली.
या बैठकीतून बाहेर आल्यानंतर ओब्रायन यांनी ज्ञानेशकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. बैठकीला सुरुवात झाल्यानंतर सात मिनिटांमध्येच वातावरण तणावपूर्ण बनले. त्यामुळे ही बैठक अचानक संपवण्यात आली. बैठकीदरम्यान ज्ञानेशकुमार यांनी शिष्टमंडळाला ‘चालते व्हा’, असे फर्मावले असे ओब्रायन यांनी पत्रकारांना सांगितले.
आयोगाकडून दाव्याचे खंडन
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिष्टमंडळाचे आरोप फेटाळून लावले. बैठकीमध्ये कोणतीही अनुचित भाषा वापरली गेली नसल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले. तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळातील नेते बैठकीमध्ये अत्यंत आक्रमकपणे वागत होते, मोठ्याने आवाज चढवून बोलत होते. त्यानंतर आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या नेत्यांना शिष्टाचार पाळण्याची विनंती केली होती, असा दावा आयोगाकडून करण्यात आला. आयोगाने सूत्रांच्या आधारे आपले म्हणणे मांडले असून अधिकृत भूमिका मांडलेली नाही. दोन्ही बाजूंकडील दाव्या-प्रतिदाव्यांमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय तणावात भर पडल्याचे स्पष्ट झाले.
आम्ही आमच्या चिंता मांडण्यासाठी गेलो होतो, पण काहीच मिनिटांत आम्हाला ‘चालते व्हा’ असे सांगण्यात आले. एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी निवडणूक आयोग अशा प्रकारे वागतो का? आम्हाला आमचे म्हणणे पूर्णपणे मांडण्याची संधीही दिली गेली नाही. – डेरेक ओब्रायन, खासदार, तृणमूल काँग्रेस</p>
