scorecardresearch

साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी आज चुरस; ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे रिंगणात

साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी (११ मार्च) निवडणूक होत असून त्यासाठी ज्येष्ठ मराठी साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी हिंदी साहित्यिक व अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक तसेच कन्नड साहित्यिक डॉ. मल्लेपुरम व्यंकटेश यांना आव्हान दिले आहे.

anghnath pathare
ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे

नवी दिल्ली : साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी (११ मार्च) निवडणूक होत असून त्यासाठी ज्येष्ठ मराठी साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी हिंदी साहित्यिक व अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक तसेच कन्नड साहित्यिक डॉ. मल्लेपुरम व्यंकटेश यांना आव्हान दिले आहे. मराठी साहित्यिकाला आत्तापर्यंत एकदाही अकादमीचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळालेला नसून यंदा तरी तो मिळेल का, याची साहित्य वर्तुळात उत्सुकता आहे.

गेल्या वेळी ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले होते. मात्र, त्यांना फक्त चार मते मिळाली होती. प्रचार न करण्याची नेमाडे यांनी केलेली चूक यावेळी दुरुस्त करण्याचा पठारे यांनी प्रयत्न केला आहे. साहित्य अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेच्या अधिकाधिक सदस्यांशी पठारे यांनी संपर्क साधला आहे. शिवाय, पठारेंच्या कादंबऱ्यांचे अन्य भाषांमध्ये अनुवाद झालेले असल्यामुळे अन्य भाषक साहित्यिकांनाही पठारे परिचित आहेत. त्यामुळे नेमांडेंपेक्षा पठारेंना विजयाची अधिक संधी असू शकते, असे या निवडणुकीच्या घडामोडींशी संबंधित समीक्षकांचे म्हणणे आहे.

सर्वसाधारण परिषदेमध्ये २४ भाषांतील प्रतिनिधींसह एकूण ९९ सदस्य आहेत. मंडी हाऊस येथील रवींद्र भवनातील साहित्य अकादमीच्या मुख्यालयामध्ये शनिवारी अकरा वाजल्यानंतर मतदान होईल. गेल्या वेळी ८९ सदस्यांनी मतदान केले होते, त्यापैकी ५६ मते कवी-नाटककार चंद्रशेखर कम्बार यांना मिळाली होती. ओदिशातील साहित्यिक प्रतिभा रे यांना २९ तर, साहित्यिक-समीक्षक भालचंद्र नेमाडे यांना ४ मते मिळाली होती. यापूर्वीही साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे डाव्या-उजव्या विचारांच्या संघर्षांच्या दृष्टिकोनातून पाहिले गेले होते. कम्बार यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर उजवीकडे वळलेला प्रशासकीय लंबक संतुलित झाला आणि अकादमीची स्वायत्तता पुन्हा प्रस्थापित झाली, असे मानले गेले होते.

  वर्चस्व कोणाचे?

साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेकदा दक्षिणेतील साहित्य वर्तुळाचे वर्चस्व राहिल्याचे दिसले. आत्तापर्यंत वि. कृ. गोकाक (१९८३), यू. आर. अनंतमूर्ती (१९९३) आणि मावळते अध्यक्ष चंद्रशेखर कम्बार (२०१८) हे तीन कन्नड साहित्यिक अकादमीचे अध्यक्ष झाले. यावेळी कर्नाटक संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मल्लेपुरम व्यंकटेश निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यंदाची अकादमीच्या अध्यक्षपदाची निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी राजकीय वर्चस्वाची असल्याचे मानले जात आहे. भाजप-संघाला अजूनही ताब्यात घेता न आलेली साहित्य अकादमी ही देशातील एकमेव साहित्यिक संस्था आहे, असे म्हटले जाते. पण, यंदा तसा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे मत मराठी साहित्य जगतातील नामवंत समीक्षकांनी व्यक्त केले. मात्र, साहित्य अकादमी ही स्वायत्त संस्था असून आत्तापर्यंत कधीही बाह्य हस्तक्षेप झालेला नाही, असे सांगत हा दावा सर्वसाधारण परिषदेतील नियुक्त सदस्याने फेटाळला.

(रंगनाथ पठारे)

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 03:25 IST