मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांनी घेतलेल्या एकतर्फी निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निवडणूक आयोगाला नोटीस बजावत उत्तर मागितले आहे.
फॉर्म ६ मधल्या बदलांना संमती दिलेली नाही-सर्वोच्च न्यायालय
नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फॉर्म ६’ (Form 6) मधील कोणत्याही बदलांना सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली नाही, अशी टिप्पणी सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सोमवारी केली. निवडणूक आयोगाकडून अधिकृत अहवाल प्राप्त झाल्यानंतर या अर्जात नेमके कोणी आणि कसे बदल केले, याची सखोल तपासणी केली जाईल, असे संकेतही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. हा फॉर्म ६ म्हणजे नेमकं काय? हे आपण जाणून घेऊ.
फॉर्म ६ म्हणजे नेमकं काय?
फॉर्म ६ हा अर्ज निवडणूक यादीत आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठीचा अर्ज आहे.
१८ किंवा त्याहून जास्त वर्षे वय असलेल्या भारतीय नागरिकांना नोंदणी प्रक्रिया करण्यासाठीचा हा अर्ज आहे.
एखाद्या व्यक्तीने अमुक एका मतदारसंघातून नोंदणी केली असेल आणि त्याने स्थलांतरामुळे जर मतदारसंघ बदलला तर त्यासाठीही हा अर्ज भरला जातो.
अर्जदाराला आपलं नाव, वय, लिंग, जन्मस्थान, कायमस्वरूपी पत्ता आणि आधीच मतदार यादीत असलेल्या कुटुंब सदस्यांची माहिती यासारखी माहिती द्यावी लागते.
अधिवासाचा पत्ता म्हणून जन्माचा दाखला, शाळा सोडलण्याचं प्रमाणपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, UIDAI ने दिलेलं आधार पत्र यापैकी एक किंवा दोन कागदपत्रं द्यावी लागतात. जर व्यक्तीकडे वयाचा दाखला नसेल तर आई किंवा वडिलांच्या नावेही हा अर्ज भरता येतो. त्यानंतर प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं.
नव्या ‘फॉर्म ६’ मध्ये नक्की काय बदल केले?
सुधारित ‘फॉर्म ६’ मधील नवीन नियमांनुसार, नवीन मतदार म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला खालील माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे,
स्वतःची किंवा पालकांची नाव नोंदणी मागील SIR प्रक्रियेत झाली होती की नाही हे सांगावे लागेल.
इतर राज्यांमधील SIR मध्ये वापरल्या गेलेल्या आधीच्या ‘फॉर्म ६’ मध्ये अशी अट नव्हती.
