PM Modi on Election Results 2026: पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी राज्यातील विधानसभेचे निकाल लागत आहेत. निकालांचा कल स्पष्ट झाला असून भाजपाचा पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये मोठा विजय होत असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. तर तमिळनाडूमध्ये द्रमुकची सत्ता जाऊन अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची तर केरळमध्ये डाव्यांची सत्ता जाऊन काँग्रेसप्रणीत आघाडीची सत्ता आली आहे. या निवडणुकीच्या निकालावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आज पुन्हा कमाल केली असून कमळ पुन्हा फुलले आहे. भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे मार्गदर्शनही कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचे ठरले. आज पाच राज्यांसह अनेक राज्यात पोटनिवडणूक झाली. त्यातही भाजपाच्या उमेदवारांना मतदारांनी भरभरून मतदान केले.
सुनेत्रा पवारांचा उल्लेख
पोटनिवडणुकीचा उल्लेख करत असताना पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, एनडीएच्या नेत्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही मोठा विजय प्राप्त केला. त्यांचे समर्थन केल्याबद्दल मी राज्यातील सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो. जय-पराजय हा लोकशाहीमधील अविभाज्य भाग असतो. पण यावेळी पाच राज्यातील जनतेने संपूर्ण विश्वाला दाखवून दिले की, आपला भारत लोकशाहीची जननी का आहे.
पश्चिम बंगालमध्ये ९३ टक्के मतदान होणे, हा एक ऐतिहासिक विक्रम होता. आसाम, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला. यात महिलांचा विशेष सहभाग होता. ही भारतीय लोकशाहीची एक चांगली बाजू समोर आली आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
भाजपा मुख्यालयात भाषणाला येत असताना पंतप्रधान मोदी यांनी बंगाली धोती परिधान केली होती.
गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळच कमळ
१४ नोव्हेंबर २०२५ रोजी जेव्हा बिहार निवडणुकीचा निकाल लागला होता. तेव्हा मी भाजपा मुख्यालयातून बोलत असताना मी तुम्हा सर्वांना सांगितले होते की, गंगा माई बिहारहून वाहत जात पुढे गंगासागरपर्यंत जाते. आज बंगालच्या विजयाने गंगोत्रीपासून आणि गंगासागरपर्यंत कमळ आणि कमळच दिसत आहे, अशी आठवण पंतप्रधान मोदींनी करून दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “पश्चिम बंगालच्या भाग्यात आजपासून एक नवा अध्याय सुरू झाला आहे. आजपासून बंगाल भयमूक्त झाला आहे. विकासाच्या विश्वासाने भरला आहे. बंगालमध्ये आता परिवर्तन झाले आहे. या विजयामुळे वंदे मातरमच्या १५० व्या वर्षी भारतमातेला आपला प्रमाण सादर केला आहे. ४ मे चा हा दिवस ढळत असता तरी बंगाच्या भूमीत एक नवीन सूर्य उगवला आहे. अनेक पिढ्यांनी याची वाट पाहिली होती.”
“बंगालमध्ये आमच्या कित्येक कार्यकर्त्यांनी आपले जीवन समर्पित केले. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांना कित्येक यातना सहन कराव्या लागल्या. केरळ आणि बंगालमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. बंगालमधील विजयाचे श्रेय मी त्या सर्व कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना समर्पित करतो. हा विजय मी बंगालच्या जनतेला समर्पित करतो”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
बदला नाही तर ‘बदलाव’ची चर्चा होणार
निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचारावरही पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केले. राजकीय हिंसेमुळे अनेकांचे आयुष्य आजवर उद्ध्वस्त होत आले. आजपासून बंगालमधील या सवयी बदलायला हव्यात. आज भाजपाचा विजय झाला आहे. त्यामुळे बंगालमध्ये बदला नाही ‘बदलाव’ची चर्चा होणार. भय नाही तर भविष्यची चर्चा होईल. माझी सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आपण एकत्र येऊन हिंसेचे हे चक्र मोडून टाकू. हिंसेतून बाहेर येऊन बंगालची सेवा करू, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.
