हेल्मेट घातले नाही म्हणून पोलिसांनी ५०० रुपये दंड केल्याने संतापलेल्या एका व्यक्तीने पोलीस स्थानकाचा वीज पुरवठा खंडीत केल्याची घटना आग्रा येथे उघडकीस आली आहे. फिरोझाबाद जिल्ह्यातील लाइनपर पोलीस स्थानकातील वीज पुरवठा चार तासांसाठी बंद राहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी श्रीनिवासन या वायरमनला हेल्मेट न घालता दुचाकी लावल्याप्रकरणी ५०० रुपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर संतापलेल्या श्रीनिवासन याने पोलीस स्थानकाला वीज पुरवठा करणाऱ्या वीज पुरवठा करणाऱ्या स्थानिक केंद्रात (पॉवर स्टेशनमध्ये) जाऊन वीजेचा पुरवठाच खंडीत केला. “मी बडी चपेटी येथील वीज पुरवठा केंद्रातील बिघाड दुरुस्त केल्यानंतर मोटरसायकलवरुन कामगार कॉलिनीच्या वीज पुरवठा केंद्राकडे जात होतो. त्यावेळी पोलीस उप निरिक्षक रमेश चंद्रा यांनी मला थांबवले. मी हेल्मेट घालते नव्हते म्हणून ५०० रुपयांचा दंड करण्यात आला. मला पोलिसांनी थांबवले तेव्हा मी वीज पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्याशी त्याचे बोलणे करुन दिले. त्यांनाही मला माफ करण्याची विनंती पोलिसांकडे केली. तरीही मला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला,” अशी माहिती श्रीनिवासन याने दिली.

पोलिसांनी श्रीनिवासन याला वाहतुकीचे नियम समजवून सांगितले. त्यावेळी त्याने विजेचे बील न भरल्यास का होते यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली. ‘मला पोलीस वाहतुकीचे नियम समजवून सांगत होते. मी त्यांना विजेचे बील वेळेत न भरल्यास काय कारवाई होते याची माहिती दिली. लाइनपर पोलीस स्थानकाचे ६ लाख ६२ हजारांचे वीज बील थकीत आहे. त्यामुळेच मला दंड केल्यानंतर मी जाऊन पोलीस स्थानकाचा वीजपुरवठा खंडीत केला,’ असं श्रीनिवासन याने सांगितले.

दक्षिणांचल विद्युत वितरण निगम लिमिटेडचे (डीव्हीव्हीएनएल) उप विभाग अधिकारी रणवीर सिंग यांनी याप्रकरणाची माहिती दिली. ‘पोलीस स्थानकाच्या थकीत वीज बिलासाठी अनेकदा नोटीस पाठवण्यात आली. आम्ही बुधवारी या पोलीस स्थानकाच्या बीज बिलाची माहिती तपासून पाहिली. त्यावेळी पोलीस खात्याने सात लाखांचे बील थकवल्याची माहिती समोर आली. २०१६ पासून पोलीस दलाने या स्थानकाचे वीज बील भरले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यातच पोलीस सतत चलन कापत असल्याने वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांची चिडचिड होत होती. पोलिसांनी ज्या कर्मचाऱ्याला ५०० रुपयांचा दंड केला त्याला मागील चार महिन्यापासून पगार मिळालेला नाही. त्यामुळेच त्याने चलन भरु शकत नाही असं पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी त्याचे काहीच ऐकून घेतले नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेण्यात आला,’ अशी माहिती सिंग यांनी दिली.

‘आम्ही आमच्या पोलीस खात्यामधील ७० जणांविरोधात वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी कावराई केली आहे. असे असताना आम्ही त्या वायरमनला कसं सोडणार असा उलट सवाल’ लाइनपर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारी संजय सिंग यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे पोलीस खात्याने फिरोझाबाद जिल्ह्यामधील सर्व पोलीस स्थानकांच्या वीज बिलाचे १ कोटी १५ लाख रुपयांचे देयक ‘डीव्हीव्हीएनएल’ला देण्यात आल्याचे स्पष्ट केलं आहे.