Elon Musk Allegations on Donald Trump : स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंध ताणले आहेत. असं असताना एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आता गंभीर आरोप केला आहे. त्यांनी एक्सवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.
एलॉन मस्क एक्सवर म्हणाले की, “आता मोठा बॉम्ब टाकण्याची वेळ आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव एपस्टाईन फाइल्समध्ये आलं आहे. म्हणूनच ते सार्वजनिक करण्यात आलं नाही. तुमचा दिवस चांगला जावो.” तसंच ही पोस्ट भविष्यासाठी राखून ठेवा, असंही एलॉन मस्क म्हणाले आहेत.
एलॉन मस्क हे डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे विश्वासू मानले जातात. मात्र, आता एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत एक मोठं विधान केलं होतं. ‘मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प हे २०२४ ची निवडणूक हरले असते’, असा दावा इलॉन मस्क यांनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
एपस्टाईन फाइल म्हणजे काय?
जेफ्री एपस्टाईन हे एक श्रीमंत फायनान्सर होते. ते राजकारणी, सेलिब्रिटी, राजघराणे आणि शिक्षणतज्ज्ञांसह प्रसिद्ध लोकांसोबत वेळ घालवत असत. पण २००५ पासून त्यांच्या कायदेशीर अडचणी सुरू झाल्या. त्यांच्यावर १४ वर्षांच्या मुलीला लैंगिक संबंधासाठी पैसे दिल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतरच्या काळात, इतर अनेक तरुणींनी अशाच प्रकारच्या गैरवर्तनाचे दावे केले.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये, “द एपस्टाईन फाइल्स: फेज १” नावाचा एक दस्तऐवज सार्वजनिक करण्यात आला. त्यात एपस्टाईनशी संबंधित लोकांची यादी समाविष्ट होती. एपस्टाईनने अत्यंत श्रीमंत व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन करून पैसे कमवले असे मानले जात होते. त्याच्या व्यावसायिक कारवायांबद्दल बरेच काही अस्पष्ट होते. तो शक्तिशाली आणि सुप्रसिद्ध व्यक्तींच्या संपर्कात कायम राहत असे. त्यात माजी अमेरिकन राष्ट्रपती, ब्रिटिश राजघराणे आणि हॉलिवूड स्टार यांचा समावेश होता. २००८ मध्ये फ्लोरिडामध्ये बाल वेश्याव्यवसायाशी संबंधित आरोप मान्य केल्यावर त्याचे पतन सुरू झाले. त्याला १३ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली, त्या दरम्यान त्याला कामासाठी तुरुंगातून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली – या निर्णयामुळे व्यापक टीका झाली.
२०१९ मध्ये, एपस्टाईनला पुन्हा अटक करण्यात आली, यावेळी संघीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर अल्पवयीन मुलांचा समावेश असलेली मोठी लैंगिक तस्करी करणारी टोळी चालवल्याचा आरोप केला. त्याने अल्पवयीन मुलींना पैसे किंवा करिअर मदतीचे आमिष दाखवले आणि नंतर त्यांचे शोषण केले असे वृत्त आहे. त्याच वर्षीच्या अखेरीस, एपस्टाईन न्यू यॉर्कमधील त्याच्या तुरुंगाच्या कोठडीत मृतावस्थेत आढळला. त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं गेलं.