एपी, लंडन :‘‘ट्विटर’ने केलेल्या दाव्यानुसार पाच टक्क्यांहून कमी असलेल्या बनावट खात्यांचा जाहीर पुरावा द्यावा. अन्यथा ‘ट्विटर’ खरेदी करारात पुढचे पाऊल टाकता येणार नाही,’’ असे ‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी मंगळवारी स्पष्ट केले. एका ‘ट्विटर’ वापरकर्त्यांला उत्तर देताना त्यांनी हा खुलासा केला.

काल मस्क आणि ‘ट्विटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अगरवाल यांच्यात या विषयावरून ‘ट्विट’द्वारे उलटसुलट चर्चा झाली. अगरवाल यांनी सलग केलेल्या काही ‘ट्विट’द्वारे कंपनी बनावट खात्यांचे प्रमाण पाच टक्क्यांहून कमी ठेवण्यासाठी कसे प्रयत्न करत आहे व ही खाती तयार करणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी कंपनीचे सुरू असलेल्या अथक प्रयत्नांविषयी खुलासा केला.

मस्क यांनी मंगळवारी यासंदर्भात केलेल्या ‘ट्विट’मध्ये म्हंटले आहे, की ‘ट्विटर’ दावा करते त्यापेक्षा त्यांची चारपट बनावट खाती आहेत. ही बनावट खाती २० टक्के आहेत आणि त्याचे प्रमाण त्याहूनही अधिक असण्याची शक्यता आहे. ‘ट्विटर’ने रोखे आणि विनिमय मंडळाकडे (सिक्युरिटी एक्स्चेंज) दिलेली माहिती अचूक असेल, असे गृहीत धरून मी हा खरेदी प्रस्ताव दिला होता. मात्र, काल ‘ट्विटर’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही बनावट खाती पाच टक्क्यांहून कमी असल्याचा पुरावा देण्यास जाहीर नकार दिला. त्यांनी हा पुरावा दिल्याशिवाय हा करार पुढे जाऊ शकणार नाही. मस्क यांनी बनावट खात्यांचा मोठा अडथळा या खरेदी करारात असल्याचेच स्पष्ट केले.

‘ट्विटर’च्या बनावट खात्यांवरून गेल्या आठवडय़ापासून वाद सुरू आहे. ‘ट्विटर’ला गेल्या महिन्यात या करारासाठी दिलेल्या ४४ अब्ज डॉलरच्या प्रस्तावापेक्षा कमी रक्कम देणार असल्याचे स्पष्ट संकेतही मस्क यांनी नुकतेच दिले. व्यवहार्य करार कमी किमतीत करणे योग्य ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.  मस्क यांची या विधानांचा अन्वयार्थ लावताना विश्लेषकांना असे वाटते, की या अब्जाधीश उद्योजकाला ‘ट्विटर’ खरेदी करारातून बाहेर पडायचे आहे अथवा ‘ट्विटर’ कमी किमतीत घ्यायचे आहे.

‘२० टक्के ‘ट्विटर’ खाती बनावट!’

‘ब्लूमबर्ग न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी मियामी येथील तंत्रज्ञानविषयक परिषदेत मस्क म्हणाले, की ‘ट्विटर’च्या २२ कोटी ९० लाख खात्यांपैकी २० टक्के खाती बनावट आहेत. आपण काढलेली ही टक्केवारी ही कमीत कमी असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.