अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योजक आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा करार तात्पुरता स्थगित केला आहे. त्यानंतर आता ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय घडतंय याची माहिती देणारे अनेक ट्वीट केले आहे.

संपूर्ण घटनेबाबत लिहिताना अग्रवाल म्हणाले की, गेल्या काही आठवड्यात बरंच काही घडलं आहे. सध्या मी केवळ कंपनीच्या कामावर लक्ष केंद्रित केलं आहे. यावेळी मी फार काही सार्वजनिक बोलू इच्छित नाहीये, पण मी माझी बाजू मांडतोय. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, ” काल आम्ही आमच्या नेतृत्व आणि इतर संचालक मंडळाबाबत बदल जाहीर केले आहेत. लोकांसाठी बदल स्वीकारणं हे नेहमीच कठीण असतं. दरम्यान काही लोकांना वाटतं की, कंपनी हस्तांतरीत केली जात असताना एक अयशस्वी सीईओ कोणताही बदल का करेल?

अग्रवाल पुढे म्हणाले की, एलन मस्क यांच्याकडून ट्विटर विकत घेण्याचा करार पूर्ण होईल, अशी मला मनापासून आशा आहे. त्यामुळे अशा स्थितीत आपण सर्व प्रकारच्या बदलांसाठी तयार राहणं आवश्यक आहे. तसेच ट्विटरसाठी जे योग्य आहे तेच आपण केलं पाहिजे, असंही ते म्हणाले. ट्विटरचा सीईओ या नात्याने कंपनी चालवण्याची जबाबदारी माझी आहे. दिवसेंदिवस ट्विटरला मजबूत बनवण्याचं काम आमचं आहे.

ट्विटरचा कोणताही कर्मचारी केवळ औपचारिकता म्हणून येथे काम करत नाही. आम्हाला सर्वांना आमच्या कामाचा अभिमान आहे. ते पुढे म्हणाले की, कंपनीच्या आगामी मालकीकडे दुर्लक्ष करून, “आम्ही ग्राहक, भागीदार, शेअरधारक आणि तुम्हा सर्वांसाठी ट्विटर एक उत्पादन म्हणून त्यात सातत्याने सुधारणा करण्याचं काम करत आहोत. पराग अग्रवाल यांनी ट्विटद्वारे हेही स्पष्ट केलं की, मी अजूनही काम करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. या काळात आवश्यकतेनुसार कठीण निर्णय घेण्यास आम्ही पूर्णपणे स्वातंत्र आहोत. कंपनीच्या भल्यासाठी यापुढेही असेच बदल होत राहतील, असंही ते म्हणाले.