Elon Musk Instagram Statement : टेस्ला आणि ‘एक्स’चे मालक एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा ‘मेटा’च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीका केली आहे. “इन्स्टाग्राम मुलींसाठी आहे”, अशी टिप्पणी करत मस्क यांनी सोशल मीडियावर नवी चर्चा सुरू केली. १ ऑक्टोबर रोजी व्हेंचर केपिटॅलिस्ट गाइगर कॅपिटल यांच्या एका पोस्टला उत्तर देताना मस्क यांनी ही प्रतिक्रिया दिली. संबंधित पोस्टमध्ये इन्स्टाग्रामला “महिलांसाठी केंद्रित असलेले अॅप” असल्याचे नमूद करत आपण आपले इन्स्टाग्राम खाते हटवल्याचे सांगितले. त्यावर मस्क यांनी, “इन्स्टाग्राम मुलींसाठी आहे”, अशी टिप्पणी केली. ही पोस्ट अवघ्या काही वेळातच व्हायरल झाली असून हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
मस्क यांची ही पहिली टिप्पणी नाही
मस्क यांनी यापूर्वीही इन्स्टाग्रामवर अशीच टिप्पणी केली होती. मे महिन्यातही सोशल मीडियाच्या वापराबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी “इन्स्टाग्राम मुलींसाठी आहे”, असे म्हटले होते. तसेच काही पुरुषांनी त्यांना इन्स्टाग्राम प्रोफाइलच्या लिंक्स पाठवण्याबाबतही त्यांनी थट्टा केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यावेळी जोरदार टीका झाली होती आणि सोशल मीडियावर लिंगभेदाच्या रूढ कल्पनांवर एक मोठी चर्चा रंगली होती.
‘एक्स’ आणि ‘मेटा’मधील वादाची पार्श्वभूमी
मस्क यांची ही टिप्पणी ‘एक्स’ आणि ‘मेटा’मधील दीर्घकाळ सुरू असलेल्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आली आहे. जुलै २०२३ मध्ये मार्क झुकरबर्ग यांच्या ‘मेटा’ने ‘थ्रेडस’ हे टेक्स्ट-आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू केले. हे अॅप इन्स्टाग्रामशी जोडलेले असल्याने त्याला मोठा वापरकर्ता वर्ग सहज उपलब्ध झाला. ‘थ्रेडस’ला ‘एक्स’साठी थेट स्पर्धक मानले गेले. त्यानंतर मस्क आणि झुकरबर्ग यांच्यात अनेकदा सोशल मीडियावर शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या.
कृत्रिम बुद्धिमतेच्या क्षेत्रातही स्पर्धा
सोशल मीडियाबरोबरच मस्क आणि ‘मेटा’मध्ये कृत्रिम बुद्धिमतेच्या क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. मस्क यांची ‘एक्सएआय’ कंपनी आणि ‘मेटा’च्या कंपन्या आता एआय क्षेत्रात वेगाने काम करत आहेत. २०२५ मध्ये मस्क यांनी ‘एक्स’ आणि ‘एक्सएआय’ यांचं एकत्रीकरण केलं, ज्यामुळे सोशल मीडिया आणि एआय व्यवसाय एकाच छताखाली आले.
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
मस्क यांच्या पोस्टनंतर काही वापरकर्त्यांनी त्यांच्याशी सहमती दर्शवली. एका युजरने “एक्स हे मुलांसाठी आहे”, अशी टिप्पणी केली. तर काहींनी मस्क यांच्या मताशी असहमती दर्शवली. एका वापरकर्त्याने लिहिलं, “इन्स्टाग्राम हे सर्व लिंगांसाठी खुलं व्यासपीठ आहे. तिथे विविधता, समावेशकता आणि सकारात्मकता अधिक दिसते.” आणखी एका युजरने उपरोधिक प्रतिक्रिया देत म्हटलं, “मस्क यांना स्वतःचं इन्स्टाग्राम अकाउंट तयार केल्यानंतर ही गोष्ट समजली.”
मस्क यांची ही टिप्पणी केवळ सोशल मीडियावरील एक वादग्रस्त पोस्ट असली, तरी ती ‘एक्स’ आणि ‘मेटा’मधील दीर्घकाळ चालत आलेल्या स्पर्धेचं आणखी एक उदाहरण म्हणून पाहिली जात आहे.
