Elon Musk joins PM Modi and Donald Trump call : मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शांततेसाठी प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व देशांच्या प्रमुखांशी बोलत असून त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही संवाद साधलाय. दरम्यान, या संवादादरम्यान तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज एलॉन मस्क (Elon Musk) हेसुद्धा सहभागी झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिकेतील न्यू यॉर्क टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलंय.
न्यू यॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, “एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मंगळवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील फोन कॉलमध्ये सहभाग घेतला. युद्धाच्या संकटकाळात दोन देशांच्या प्रमुखांमधील चर्चेत एका खाजगी नागरिकाची अशा प्रकारे उपस्थिती असणे ही एक असामान्य घटना आहे.”
कोणतेही अधिकृत सरकारी पद नसतानाही, विशेषतः सक्रिय संघर्षाच्या काळात जागतिक नेत्यांमधील संवेदनशील चर्चेत मस्क (Elon Musk) यांचा झालेला समावेश सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या माहितीनुसार, या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू मध्य पूर्वेतील वाढते संकट आणि विशेषतः जागतिक ऊर्जेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’वर इराणच्या नियंत्रणाबाबतची चिंता हा होता. दरम्यान, मस्क (Elon Musk) यांना या चर्चेत का सामील करण्यात आले किंवा त्यांनी या चर्चेत सक्रिय सहभाग खरंच घेतला होता का, याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांचे संबंध सुधारले?
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, मस्क (Elon Musk) यांची उपस्थिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांचे सुधारलेले संबंध दर्शवू शकते. मस्क यांचे अंतराळ, ऊर्जा आणि उदयोन्मुख बाजारपेठांमधील व्यावसायिक हितसंबंध आखाती देश आणि भारतासह या संकटाचा थेट परिणाम होणाऱ्या क्षेत्रांशी जोडलेले आहेत.
मस्क (Elon Musk) भारतात आपला व्यवसाय विस्तारण्याचा प्रयत्न करत असून, त्यांच्या सॅटेलाईट इंटरनेट सेवांसारख्या उपक्रमांना अद्याप नियामक मंजुरी मिळणे बाकी आहे. दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा मुख्य भर हॉर्मुझ सामुद्रधुनीतील स्थिरता सुनिश्चित करण्यावर होता, कारण जागतिक तेल आणि वायू वाहतुकीचा मोठा हिस्सा याच मार्गावरून जातो.
