जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या संपत्तीत या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांत ५० अब्ज डॉलरची घट झाली आहे. इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी झालेली घसरण हे त्याचे प्रमुख कारण ठरले आहे.

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या इतिहासात अवघ्या दोन दिवसांत अब्जाधीशांच्या संपत्तीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. एका दिवसात सर्वाधिक मालमत्ता गमावण्याच्या बाबतीतही मस्क दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. एका दिवसात सर्वाधिक संपत्ती गमावण्याचा विक्रम अॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांच्या नावावर आहे. २०१९ मध्ये मॅकेन्झी स्कॉटसोबत घटस्फोट घेतल्यानंतर बेझोसची संपत्ती एका दिवसात ३६ अब्ज डॉलरने कमी झाली होती. तर, मंगळवारी मस्कच्या संपत्तीत तब्बल ३५ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.

शेअर्समध्ये घसरणीचं कारण काय?

टेस्ला शेअर्समधील ही घसरण एलोन मस्क यांच्या एका ट्विटमुळे झाली आहे. एलॉन मस्क यांनी अलिकडेच ट्विटरवर टेस्लामधील त्यांच्या १० टक्के भागीदारी विकण्याबद्दल एक सर्वेक्षण केले होते. या पोलमध्ये ३५ लाखांहून अधिक लोकांनी ट्विटरवर मतदान केले होते. यापैकी ५८ टक्के लोकांनी शेअर विकण्याच्या बाजूने मतदान केले होते. मतदानानंतर लगेचच दुसर्‍या ट्विटमध्ये मस्क यांनी वचन दिले की, निकाल काहीही असो, ते त्या निकालाचे पालन करतील. त्यामुळे आता एलॉन मस्क यांना टेस्लामधील आपली हिस्सेदारी १० टक्क्यांनी कमी करावी लागणार आहे.

मस्कच्या छोट्या भावाने विकले टेस्लाचे ११ कोटींचे शेअर्स

या मतदानाच्या काही काळापूर्वीच एलोन मस्कचा भाऊ किंबल मस्कने टेस्लाचे १०.९ कोटी डॉलर्स किमतीचे शेअर्स विकले. ही बातमी समोर आल्याने टेस्लाच्या शेअर्सला देखील फटका बसला. किंबलने सुमारे $१,२३० च्या किमतीत ८८,५०० शेअर्स विकले. त्यांनी टेस्लाचे २५ हजार शेअर्स एका संस्थेलाही दान केले.

एलोन मस्क अजूनही सर्वात श्रीमंत व्यक्ती

या घसरणीनंतरही एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार, मस्क यांची सध्या २८८ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेझोसच्या संपत्तीपेक्षा ती अजूनही ८३ अब्ज डॉलर्स अधिक आहे. दोन दिवसांपूर्वी हा फरक तब्बल १४३ अब्ज डॉलर्सचा होता.