JD Vance On Donald Trump Vs Elon Musk : टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केल्यामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्यातील मैत्री शत्रुत्वात बदलल्याचं बोललं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या एका विधेयकांवर एलॉन मस्क यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद सुरु झाला. त्यानंतर हा वाद एवढा टोकाला गेला की दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले.
मस्क यांनी म्हटलं की माझ्याशिवाय ट्रम्प निवडून आले नसते. तसेच जेफ्री एपस्टाईनला अमेरिकेत लैंगिक गुन्हेगार म्हणून दोषी ठरवण्यात आलं होतं, या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव असल्याचा गंभीर आरोप मस्क यांनी केला. या संदर्भात त्यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्टही केली होती. मात्र, यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाल्यानंतर मस्क यांनी ही पोस्ट हटवली. एवढंच नाही तर त्यानंतर थेट नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत मस्क यांनी संकेत दिले.
त्यानंतर आता मस्क यांच्याबरोबरचं नातं संपल्याचं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा इशारा दिला. मस्क यांना खूप गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं असं ट्रम्प यांनी म्हटलं. दरम्यान, त्यानंतर या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना लक्ष्य करून मस्क हे मोठी चूक करत असल्याचं जेडी व्हान्स यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत मस्क यांनी केलेल्या एका पोस्टचा संदर्भ देत जेडी व्हान्स यांनी म्हटलं की, त्यांनी आपला संयम गमावला आहे. पण मला खरंच वाटतं की मस्क यांनी थोडं शांततेने घेतलं तर सगळं ठीक होईल. मला वाटतं की राष्ट्राध्यक्षांना अशा प्रकारे बोलणे किंवा विरोधात जाणे ही त्यांची खूप मोठी चूक आहे. हे देशासाठी वाईट आहे. मला आशा आहे की मस्क पुन्हा सरकारबरोबर येतील”, असं एका मुलाखतीत बोलताना जेडी व्हान्स यांनी म्हटलं आहे.
‘मस्क यांच्या बरोबरचं नातं संपलं’, डोनाल्ड ट्रम्प
एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांच्याशी त्यांचे संबंध संपुष्टात आल्याचं स्पष्ट केलं. ट्रम्प यांनी म्हटलं की, ‘हो आमचे संबंध संपुष्टात आले असं मी आता गृहीत धरतो.’ तसेच मस्क यांच्याबरोबरचे संबंध सुधारण्याची आता कोणतीही इच्छा नाही आणि मस्क यांनी आगामी मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्सना मदत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांना दिला.
मस्क यांनी नवीन राजकीय पक्षाचे दिले संकेत
ट्रम्प यांच्याशी सुरु असलेल्या वादानंतर आता मस्क यांनी थेट राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. मस्क यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पोस्टमध्ये त्यांनी जनतेचा पोल घेतला. त्यामध्ये मस्क यांनी असं म्हटलं की, “अमेरिकेत ८० टक्के मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची वेळ आली आहे का?” असं म्हटलं. तसेच या प्रश्नावर अगदी ८० टक्के लोक सहमत असल्याचा दावाही त्यांनी केला. याबरोबरच ही पोस्ट शेअर करत द अमेरिका पार्टी असं सूचक नवीन नावही त्यात सूचवलं. इलॉन मस्क यांच्या या पोस्टमुळे ते नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या विचारात आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.