Elon Musk जगातले अब्जाधीश व्यावसायिक अशी ओळख असलेल्या एलॉन मस्क यांना अडकवण्यासाठी रशियातल्या हेरांनी एक कट रचला होता. त्याची माहिती आता समोर आली आहे. अमेरिकेच्या FBI चे माजी एजंट जोनाथन बुमा यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी एलॉन मस्क यांना कसं अडकवण्यात येणार होतं याविषयीचे दावे केले आहेत.
काय म्हटलं आहे बुमा यांनी?
बुमा यांच्या दाव्यांनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुप्तहेरांच्या एका योजनेला मान्यता दिली होती. जर्मन ब्रॉडकास्टर ZDF ने प्रसारित केलेल्या एका माहितीपटात हे सगळे दावे केले आहेत. युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरु झाल्यानंतर एलॉन मस्क आणि पेपालचे सह संस्थापक पीटर थिएल यांच्यावर रशियातल्या हेरांनी नजर ठेवली होती. ब्लॅकमेलिंग, सेक्स याचा वापर करुन यांच्याकडून गुप्त माहिती काढायची असा कट रचण्यात आला होता.
ब्लॅकमेलिंगचा मास्टर प्लान
बुमा यांनी सांगितंलं की रशियातील गुप्तचर संस्था यांना एलॉन मस्क यांना अडकवण्यात रस होता. मस्क यांचे महिलांशी असलेले संबंध, ड्रग्ज तसंच केटाइमन यांच्यासारख्या गोष्टी या आपल्यासाठी संधी आहेत असं रशियातल्या हेरांना वाटलं होतं. याचाच उपयोग करुन एलॉन मस्क यांना ब्लॅकमेल करण्याची योजना आखली गेली होती असा दावा बुमा यांनी केला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

रशियातील हेरांचा हेतू यामागे नेमका काय होता?
बुमा यांनी केलेल्या दाव्यानुसार मस्क आणि पेपालचे सहसंस्थापक पीटर थल यांना युक्रेन युद्धानंतर लक्ष्य करावं असं ठरलं होतं. मस्क यांच्या आयुष्याशी निगडीत गुप्त माहिती मिळवणं हा यामागचा उपयोग होता. वेळ आल्यानंतर ब्लॅकमेलिंगसाठी या माहितीचा उपयोग केला जाईल हा यामागचा मुख्य हेतू होता. बुमा यांच्या दाव्यानुसार पुतिन यांना ही सगळी कल्पना होती. पुतिन यांची मंजुरी नसेल तर रशियाचे एजंट्स कामच करणार नाहीत असंही बुमा यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
जोनाथन बुमा कोण आहेत?
जोनाथन बुमा हे १६ वर्षे एफबीआयमध्ये काम करत होते. मार्चमध्ये त्यांना गोपनीय माहिती सार्वजनिक केल्याच्या आरोपांवरुन अटक करण्यात आली. गोपनीय माहिती त्यांनी उघड केली असा आरोप त्यांच्यावर आहे. १० लाख डॉलर्सच्या जामिनानंतर बुमा यांना मुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान एका माहितीपटातील मुलाखतीत त्यांनी एलॉन मस्क यांच्याबाबत हा खुलासा केला आहे.