भारतीय अंतराळ क्षेत्रात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली असून, एका खाजगी स्टार्टअपने थेट जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. बेंगळुरूस्थित ‘गॅलेक्सआय’ (GalaxEye) या अंतराळ स्टार्टअपच्या ‘मिशन दृष्टी’ (Mission Drishti) उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या ऐतिहासिक यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले असता, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांनी देखील “अभिनंदन” (Congratulations) म्हणत भारतीय तिरंगा इमोजी पोस्ट करून भारताचे कौतुक केले आहे.

नेमकं प्रकरण काय?

रविवारी कॅलिफोर्निया येथून एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ (SpaceX) कंपनीच्या फॅल्कन ९ रॉकेटद्वारे ‘मिशन दृष्टी’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘X’ वर पोस्ट करत या मिशनला भारताच्या अंतराळ प्रवासातील एक मोठा टप्पा म्हटले होते. मोदींच्या या पोस्टला उत्तर देताना मस्क यांनी भारताचे अभिनंदन केले, ज्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय अंतराळ उद्योगाची चर्चा रंगली आहे.

‘मिशन दृष्टी’ का आहे खास?

हा उपग्रह केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी विशेष ठरला आहे. जगातील पहिला ऑप्टोसॉर (OptoSAR) उपग्रह यामध्ये इलेक्ट्रो-ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपर्चर रडार या दोन्ही प्रणालींचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. सामान्य उपग्रह ढगाळ वातावरणात किंवा रात्रीच्या वेळी स्पष्ट फोटो घेऊ शकत नाहीत. मात्र, या उपग्रहातील रडार तंत्रज्ञानामुळे कोणत्याही हवामानात आणि दिवसा-रात्री कधीही स्पष्ट फोटो मिळवणे शक्य होणार आहे. हा भारताच्या खाजगी क्षेत्रात तयार झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा उपग्रह आहे.

या उपग्रहाचा उपयोग काय?

‘मिशन दृष्टी’ कडून मिळणाऱ्या अचूक माहितीचा उपयोग विविध क्षेत्रांत होणार आहे. यामध्ये सीमाभागातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी, पिकांच्या आरोग्याचे निरीक्षण आणि उत्पादन अंदाज घेण्यासाठी, पूर किंवा चक्रीवादळाच्या वेळी बचावकार्यासाठी अचूक माहिती मिळवण्यासाठी, रस्ते आणि शहरांच्या नियोजन यासारख्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात या उपग्रहाचा उपयोग महत्वाचा ठरणार आहे.

भविष्यातील ध्येय

‘गॅलेक्सआय’ या कंपनीचा प्रवास इथेच थांबणार नसून, २०३० पर्यंत १० उपग्रहांचा समूह अवकाशात पाठवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. यामुळे भारताकडे पृथ्वी निरीक्षणाची स्वतःची आणि अत्यंत आधुनिक अशी यंत्रणा उपलब्ध होईल, जी इस्रोच्या (ISRO) मोहिमांना पूरक ठरेल.

एलॉन मस्क यांची प्रतिक्रिया भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी एक मोठी पावती मानली जात आहे. यामुळे आगामी काळात भारतीय स्टार्टअप्सना जागतिक गुंतवणूक आणि संधी मिळण्याची दारे खुली झाली आहेत.