Starlink India Pricing revealed : एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या स्टारलिंक या सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिसने त्यांचे भारतातील रेसिडेंशियल प्लॅनच्या किंमत जाहीर केली आहे. यामधून कंपनी भारतात त्यांचा विस्तार करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. ब्रॉडबँड नसलेल्या भागांमध्ये ही सेवा देणे सुरू करण्याच्या उद्देशाने नियामक प्रक्रिया आणि टेक्निकल ग्राउंडवर्क अनेक महिन्यांपासून केले जात होते, त्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
स्टारलिंक इंडियाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या अपडेटनुसार, रेसिडेंशियल प्लॅनचा महिन्याचा दर हा ८६०० रुपये निश्चित करण्यात आला आहे, तर हॉर्डवेअर किटची किंमत ही ३४ हजार रुपये ठेवण्यात आली आहे आणि ती एकदाच भरावी लागेल. ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा मिळेल. तसेच ही सेवा विकत घेण्याच्या आधी त्याच्या कनेक्शनची चाचणी घेण्यासाठी ३० दिवसांचा ट्रायल कालावधी देखील दिला जाणार आहे. स्टारलिंकने म्हटले आहे की, त्यांचे उपकरण सेट अप करणे सोपे आहे आणि ते सर्व प्रकारच्या हवामानाचा समाना करू शकते.
स्टारलिंकने असाही दावा केला आहे की त्यांचे हे नेटवर्क ९९.९ टक्क्यांहून अधिक अपटाइमसाठी तयार केले आहे. यामुळे, ज्या ठिकाणी स्थिर इंटरनेटचा पर्याय उपलब्ध नाही, अशा ठिकाणी याचा मोठा फायदा होईल.
बिझनेस प्लॅनची अद्याप प्रतिक्षा
बिझनेस प्लॅनबद्दलची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. स्टारलिंक लवकरच त्यांचे कमर्शियल पॅकेज जाहीर करेल असे अपेक्षित आहे. कारण कंपनी पूर्ण सेवा लाँच करण्यासाठी काम करत आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे.
कोणाला फायदा होणार?
भारतात स्टारलिंकची सुरूवात ही, पारंपरिक ब्रॉडबँड नेटवर्क मर्यादित आहेत अशा ठिकाणी विद्यार्थी, लहान उद्योग आणि ग्रामीण भागांमधील स्थानिक प्रशासनासाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र भारताच्या टेलिकम्युनिकेशन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतरच स्टारलिंक सेवा भारतात सुरू होऊ शकेल.
स्टारलिंकची भारतात एन्ट्री
एलॉन मस्क यांच्या स्ट्रारलिंक कंपनीने भारतात सॅटेलाइट इंटरनेट सुरू करण्याच्या दृष्टीने यावर्षी नोव्हेंबरमध्ये मोठे पाऊल टाकले. देशात कंपनीबरोबर भागीदारी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य बनले. राज्य सरकारने या कंपनीबरोबर सहकार्याची घोषणा केली असून यामुळे भारताच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वाढीच्या एका नवीन टप्प्याची सुरुवात झाली आहे.
