Elon Musk Starlink License India issue Marry Millben : स्पेसएक्स, टेस्ला या कंपन्यांचे सीईओ सध्या भारतात स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून त्यांना येथे परवाना मिळालेला नाही. यातून सुरू झालेल्या वादात आता अमेरिकेची प्रसिद्ध गायिका मेरी मिलबेन हिने एन्ट्री घेतली असून तिने एलॉन मस्क यांना सल्ला दिला आहे.

एलॉन मस्क यांना टॅग करत मेरी मिलबेन म्हणाली, “माझ्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड आदर आहे, म्हणून मी हे सांगत आहे. राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांशी जवळीक साधल्याने भारतातील स्टारलिंकचा परवाना लवकर मिळणार नाही, उलट त्याला आणखी उशीर होऊ शकतो. जगभरातील कंपन्या भारतात यशस्वीपणे व्यवसाय करत आहेत. कोणत्याही परदेशी भागीदारीची सुरुवात देशाबद्दल आणि तिथल्या नेतृत्वाबद्दलच्या आदराने होते. राहुल गांधींमध्ये देशाबद्दल आणि पंतप्रधान मोदींबद्दल आदर नाही. ते चुकीची संगत आहेत.”

मेरी मिलबेनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे, “दुसरीकडे, पीएम मोदी हे आजच्या जगातील सर्वात महान आणि शक्तिशाली नेत्यांपैकी एक आहेत आणि ते दीर्घकाळ भारताचे नेतृत्व करणार आहेत. तुम्हाला जर खरंच भारतात परवाना हवा असेल, तर तुमचे सार्वजनिक संदेश राहुल गांधींसारख्या नेत्यांऐवजी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वळवावेत असा मी सल्ला देईन.”

अमेरिकेत मिळालेल्या सर्वोच्च पुरस्काराबद्दल अभिनंदन

याच पोस्टमध्ये युझरने मस्क यांचे अमेरिकेत मिळालेल्या प्रतिष्ठित नागरी पुरस्काराबद्दल अभिनंदनही केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (८ ऑक्टोबर २०२६) वॉशिंग्टन येथे मस्क यांना विज्ञानातील योगदानासाठी सर्वोच्च ‘नॅशनल मेडल ऑफ सायन्स’ देऊन सन्मानित केले आहे. युझरने याबद्दल मस्क यांचे कौतुक करत अमेरिकेसाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल आभार मानले आहेत.

पार्श्वभूमी काय आहे?

स्टारलिंकला भारतात गेल्या ५ वर्षांपासून सर्व नियमांचं पालन करूनही व्यावसायिक परवाना मिळालेला नाही. यामुळे एलॉन मस्क यांनी एक्स पोस्ट करत टीका केली होती. त्यांनी भारतातील काही उद्योगपतींवर मक्तेदारी राखण्यासाठी हा परवाना रोखत असल्याचा आरोप केला होता. या पोस्टमध्ये थेट त्यांनी अंबानींचं नाव घेऊन ते देशाचे बॉस आहेत का असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत भारतात एलॉन मस्क यांचं स्वागत आहे. दुसऱ्या व्यक्तीचं नाव समोर येईपर्यंत थांबा असंही त्यांनी उपरोधिकपणे म्हटलं. राहुल गांधींच्या या पोस्टलाही एलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया देत त्यांचे आभार मानले.