Elon Musk to launch America Party : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ख्याती असलेले व्यावसायिक एलॉन मस्क आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिगणी पडली आहे. मस्क यांनी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या नव्या कर व खर्च विधेयकावर (Tax and Spending Bill) हल्लाबोल केला आहे. या विधेयकाचं मस्क यांनी बिग ब्युटीफुल बिल असं वर्णन केलं आहे. हे विधेयक मुर्खपणाचं असल्याची टिप्पणी मस्क यांनी केली आहे. यासह मस्क यांनी ट्रम्प यांना इशारा देखील दिला आहे. मस्क म्हणाले, “हे विधेयक मंजूर झालं तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी अमेरिका पार्टीची स्थापना करेन.”
एलॉन मस्क यांनी अलीकडेच एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोल (मतदान) घेतला होता. याद्वारे त्यांनी अमेरिकन जनतेला नव्या राजकीय पक्षाबाबत त्यांचं मत विचारलं होतं. यावर मोठ्या संख्येने लोकांनी मस्क यांना पाठिंबा दर्शवला, नव्या पार्टीसाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनंतर मस्क यांनी पक्षासाठी ‘अमेरिका पार्टी’ या नावाची घोषणा देखील केली.
एलॉन मस्क काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांचं महत्त्वकाक्षी नवं कर व खर्च विधेयक मंजुरीसाठी सीनेटसमोर सादर करण्यात आलं आहे. यावरून मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक्सवरून इशारा दिला आहे. मस्क म्हणाले, “हे विधेयक मंजूर करणं वेडेपणा ठरेल. हे मुर्खपणाचं विधेयक मंजूर झालं तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही अमेरिका पार्टीची स्थापना करू. आपल्या देशाकडे डेमोक्रॅट्स व रिपब्लिकन पार्टीशिवाय इतरही पर्याय असले पाहिजेत, जेणेकरून जनता योग्य नेत्याची, पक्षाची निवड करू शकेल.”
हे विधेयक पूर्णपणे वेडेपणाचं आणि विध्वंसक आहे : मस्क
एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे की “या विधेयकामुळे अमेरिकेतील लाखो नोकऱ्या जातील आणि देशाचं मोठं आर्थिक व धोरणात्मक नुकसान होईल. इतकंच नाही, तर मस्क यांनी हे विधेयक पूर्णपणे वेडेपणाचं आणि विध्वंसक आहे. माफ करा, परंतु मी आता हे सहन करू शकत नाही. काँग्रेसचं हे हास्यास्पद, घृणास्पद आणि महागडं विधेयक आहे. ज्या लोकांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं आहे त्यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे. कारण त्यांना माहिती आहे की त्यांनी चूक केली आहे.”