Elon Musk Political Party : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून मदभेद सुरू आहेत. दोघेही एकमेकांवर जोरदार टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे विश्वासू म्हणून मस्क यांच्याकडे पाहिलं जात होतं. एवढंच नाही तर ट्रम्प यांच्या सरकारमध्ये मस्क यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी मस्क हे ट्रम्प सरकारमधून बाहेर पडले आणि त्यानंतर दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. यावरून दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला.

ट्रम्प आणि मस्क यांच्यातील मतभेदाचं कारण म्हणजे ‘बिग ब्युटीफुल बिल’. हे विधेयक अमेरिकत नुकतच मंजूर करण्यात आलं आहे. मात्र, एलॉन मस्क यांचा या विधेयकाला विरोध होता. त्यांनी ‘बिग ब्युटीफुल बिला’वरून आपलं मत मांडत ट्रम्प यांच्याविरोधात भाष्य केलं होतं. तसेच हे विधेयक अंमलात आलं तर थेट अमेरिकेच्या राजकीय मैदानात उतरण्याचे संकेत मस्क यांनी दिले होते. त्यानंतर आता एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेतला असून नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मस्क यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा करत एक प्रकारे ट्रम्प यांना थेट आव्हान दिलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

एलॉन मस्क यांनी शनिवारी त्यांच्या एक्स (ट्विटर) या सोशल प्लॅटफॉर्मवर या संदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमेरिकेत ‘अमेरिका पार्टी’ नावाचा एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. दरम्यान, मस्क आणि ट्रम्प यांच्यातील मतभेदानंतर ही घोषणा करण्यात आल्यामुळे मोठी चर्चा रंगली आहे.

एलॉन मस्क यांनी एक्सवर म्हटलं आहे की, “अमेरिका पार्टीची आज स्थापना होत आहे. या पार्टीची घोषणा तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य परत देण्यासाठी झाली आहे”, असं म्हटलं आहे. तसेच एका सर्वेक्षणाचा संदर्भ देत मस्क यांनी सांगितंल की नवीन राजकीय पर्यायासाठी जवळपास १.२ दशलक्षाहून अधिक लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच नव्या राजकीय पक्षाची घोषणा करताना मस्क यांनी सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर टीका केली आहे. “जेव्हा कचरा आणि भ्रष्टाचाराने आपला देश दिवाळखोरीत काढण्याचा विचार येतो तेव्हा आपण लोकशाहीत नव्हे तर एकपक्षीय व्यवस्थेत राहतो”, असंही म्हटलं आहे.