लंडनहून अमेरिकेतल्या शिकागो या ठिकाणी जाणाऱ्या विमानात एक हलकल्लोळ उडाला. कारण विमानाने उड्डाण घेतलं आणि त्यानंतर अचानक हे विमान २८ हजार फूट खाली आलं. विमानाने इमर्जन्सी कोड 7700 ही जारी केला होता. ज्यानंतर इमर्जन्सी जाहीर करण्यात आली. हे विमान लंडन येथील हिथ्रो विमानतळावर परतत आहे.

नेमकी घटना काय घडली?

अॅव्हिएशन न्यूज नेटवर्क AIRLIVE ने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटिश एअरवेजचं विमान BA295 लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून स्थानिक वेळेनुसार टर्मिनल ५ वरून सकाळी ११.५० ला उड्डाण केलं होतं. त्यानंतर हे विमान शिकागोला पोहण्यासाठी ८ तास ४० मिनिटं लागणार होती. उड्डाणानंतर साधारण एक तास व्यवस्थित गेला. विमान ३७ हजार फुटांवर होतं. त्यावेळी अचानक ऑपरेशनल समस्येचा सामना विमानाला करावा लागला. ज्यानंतर हे विमान काही मिनिटांत २७ हजार फूट खाली आलं. आता हे विमान ९ हजार फुटांवर आहे. फ्लाईट ट्रॅकिंग सर्व्हिस Flightradar24 ने हे स्पष्ट करत पोस्ट लिहिली की BA295 लंडन शिकागो विमानाने स्क्वॉक 7700 सिग्नल पाठवला आहे. आता हे विमान ९ हजार फुटांपर्यंत खाली आलं आहे.

Squawk 7700 म्हणजे काय?

Squawk 7700 हा चार अंकांचा एक कोड असतो. हा कोड विमानातून एअर ट्रॅफिक कंट्रोलला पाठवला जातो. कोड 7700 चा उपयोग इमर्जन्सी म्हणजेच विमानात आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यावर केला जातो. या कोडमुळे नेमकी विमानात समस्या काय निर्माण झाली आहे ते कळत नाही. पण एअर ट्रॅफिक कंट्रोलला हे कळतं की क्रू मेंबर्स आणि विमान अडचणीत आहे आणि त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग सांगितला गेला पाहिजे. एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सना विमानातील आणीबाणीच्या परिस्थितीची माहिती देण्याचं काम हा कोड करतो. तांत्रिक बिघाड, मेडिकल इमर्जन्सी किंवा इतर काही ऑपरेशनल समस्या निर्माण झाल्यास हा कोड पाठवला जातो.

ब्रिटिश एअरवेजच्या विमानाची ही घटना अशावेळी समोर आली जेव्हा फ्लायदुबई घटनेत ओमानी को पायलटने एअरलाइन्समध्ये नोकरी मिळण्यापूर्वीच इस्रायलमधल्या तेल अवीव शहरात जाणाऱ्या फ्लाईटचा क्रॅश करण्याची योजना आखली होती. ही घटना मागील आठवड्यात घडली. ही घटना ताजी असतानाच आता ब्रिटिश एअरवेजच्या विमानाबाबत ही माहिती समोर आली आहे. फ्लायदुबई विमानात १७४ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. भारतीय वंशाचे स्मित मच्छार यांनी प्रसंगावधान दाखवलं आणि सगळ्या प्रवाशांचे प्राण वाचवले.