Emergency Alert Message Government Disaster System: भारतातील कोट्यवधी लोकांचा फोन आज सकाळी खणखणला. या मेसेजची रिंगटोन सोशल मीडियावरील मेसेज किंवा इनकमिंग कॉलपेक्षाही वेगळी होती. यामुळे अनेक मोबाइल धारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाले. हल्ली सायबर स्कॅमचे प्रकार वाढल्यामुळे अनेकांना मोबाइल हॅक झाला की काय? अशीही शंका अनेकांना आली. मात्र काहीच वेळात हा आपत्कालीन संदेश सरकारकडून पाठवला गेला असल्याचे कळले. भारतात पहिल्यांदाच अशास्वरुपाचा संदेश पाठवला गेला आहे. केंद्र सरकार गेल्या काही दिवसांपासून हा संदेश पाठविण्याची तयारी करत होते. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

केंद्र सरकारच्या वतीने शनिवारी सकाळी ११:४२ च्या सुमारास आपत्कालीन यंत्रणेचा चाचणी संदेश पाठवला. एखाद्या आपत्ती संदर्भात नागरिकांपर्यंत महत्त्वपूर्ण माहिती तातडीने पोहोचेल याची खात्री करण्यासाठी असा संदेश पाठवला गेला. दूरसंचार विभाग, संचार मंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) यांच्या सहकार्याने देशभरात मोबाईल-आधारित आपत्ती संचार प्रणाली अधिक सक्षम करण्याचे कार्य सुरू करण्यात आल्याचे दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले आहे.

केंद्र सरकारने नागरिकांना आपत्कालीन सूचना देण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःची सेल ब्रॉडकास्ट मेसेजिंग प्रणाली सुरू केली आहे. :भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केले आहे. नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा. हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही. हा एक चाचणी संदेश आहे. – भारत सरकार”, असा मजकूर या संदेशात होता.

ndma emergency alert system cell broadcast testing
तुमच्या मोबाईलवर अचानक ‘Emergency Alert’चा मेसेज आलाय? घाबरू नका

दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने काय म्हटले?

“दूरसंचार विभागाचे प्रमुख संशोधन आणि विकास केंद्र असलेल्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डॉट) ने विकसित केलेली एकात्मिक इशारा प्रणाली (सॅशे) एनडीएमए ने यशस्वीरित्या कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली सध्या भारतातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत असून भौगोलिकदृष्ट्या लक्ष्यित क्षेत्रांमधील मोबाईल वापरकर्त्यांपर्यंत एसएमएसद्वारे आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीशी संबंधित इशारे पोहोचवते”, असे दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले.

या प्रणालीमुळे नैसर्गिक आपत्ती, हवामानाचे इशारे आणि चक्रीवादळांच्या वेळी १९ हून अधिक भारतीय भाषांमध्ये आजपर्यंत १३४ अब्जाहून अधिक एसएमएस इशारे प्रसारित करणे शक्य झाले असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कोणत्या आपत्कालीन घटनांमध्ये संदेश पाठवणार?

“त्सुनामी, भूकंप, वीज कोसळणे तसेच गॅस गळती किंवा रासायनिक धोके यांसारख्या मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितींसारख्या वेळेच्या दृष्टीने महत्त्वाच्या परिस्थितीत सूचनांचा प्रसार अधिक मजबूत करण्यासाठी, एसएमएस सोबत सेल ब्रॉडकास्ट (सीबी) तंत्रज्ञान सुरू करण्यात आले आहे”, असेही मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

काही जणांना अलर्ट संदेश का मिळाला नाही?

कोट्यवधी लोकांच्या मोबाइलवर आज अलर्ट मेसेज आला असला तरी असेही अनेकजण आहेत, ज्यांच्या मोबाइलवर संबंधित मेसेज आला नाही. याची अनेक कारणे आहेत, असे सरकारने सांगितले. ही केवळ चाचणी असल्यामुळे देशभरात एकाचवेळी मेसेज पाठवण्याऐवजी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आणि विविध मोबाइल नेटवर्कद्वारे संदेश पाठवला गेला.

डिव्हाइसची सेटिंग्जही कारणीभूत

तसेच प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या सेटिंग्ज असल्यामुळेही हे मेसेज आलेले नाहीत. जुने स्मार्टफोन, हँडसेट, तसेच आपत्कालीन सूचना सेटिंग्ज बंद असल्यामुळेही अनेकांना हे संदेश प्राप्त झालेले नाहीत. तसेच सिग्नल न मिळणे, तळघरात किंवा लिफ्टमध्ये असलेले लोक किंवा ज्यांना घरी व्यवस्थित नेटवर्क मिळत नाही, एअरप्लेन मोडवर असलेले फोन, मोबाइल नेटवर्क एक्सेस नसलेल्या फोन्सना हा अलर्ट संदेश प्राप्त होणार नाही.

सिम कार्डशिवाय अलर्ट मिळणार?

मोबाइलमध्ये सिम कार्ड असेल तरच नेटवर्क मिळते, असे नाही. स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच स्वतःचे कम्युनिकेशन हार्डवेअर असते. ज्यामध्ये मोडम चीप, अँटीना सिस्टिम आणि रेडिओ कॉम्पोनंट्सचा समावेश असतो. हे भाग जवळपास असलेल्या सेल्युलर टॉवर्स शोधणे आणि वायरलेस कम्युनिकेशन हाताळण्यास जबाबदार असतात.

मुख्यमंत्री फडणवीस याबाबत काय म्हणाले?

आज सर्वांना मोबाइलवर जे संदेश देण्यात आहेत, त्याची यापूर्वीच आपल्या सर्वांना कल्पना देण्यात आली होती. आपल्यासाठी आनंदाची बाब म्हणजे संपूर्ण भारतीय बनावटीची ही अलर्ट सिस्टिम तयार करण्यात आली आहे. युद्ध, आपत्ती आणि आणीबाणीच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाइलवर त्याच्या भाषेत अलर्ट आपल्याला देता येणार आहे. त्याची चाचणी घेण्यात आली. सर्वांना त्यांच्या त्यांच्या भाषेत अलर्ट मिळाला. युद्धजन्य परिस्थितीमध्ये जी तयारी आवश्यक असते, ती भारत सरकारने उत्तमरित्या केली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.