नवी दिल्ली : ‘वंदे मातरम’वरून काँग्रेस आणि पंडित नेहरू यांच्यावर टीका करणाऱ्या पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ‘वंदे मातरम’ला १०० वर्षे झाली तेव्हा देश आणीबाणी लादली गेली होती. तेव्हा देशभक्तीसाठी जगणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आले, असे मोदी म्हणाले. १९०५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत असताना महात्मा गांधींनी ‘वंदे मातरम’ची देशातील लोकप्रियता बघून, ‘हे गीत जणू राष्ट्रगीत बनले आहे’, अशी स्तुती केली होती. पण, त्यानंतर १०० वर्षे ‘वंदे मातरम’वर अन्याय केला गेला. राष्ट्रगीताचा विश्वासघात केला गेला, असा आरोप करून मोदींनी काँग्रेसवर शरसंधान साधले.
‘वंदे मातरम’ला दीडशे वर्षे झाल्यानिमित्त लोकसभेत सोमवारी दिवसभर चर्चा आयोजित करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. १८७५ मध्ये ज्येष्ठ साहित्यिक बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ‘वंदे मातरम’ची दोन कडवी लिहिली होती. नंतर त्यांच्या आनंदमठ (१८८२) या कादंबरीत हे गाणे समाविष्ट केले गेले. त्यामध्ये त्यांनी अतिरिक्त सहा कडव्यांचा समावेश केला. ‘वंदे मातरम’ हे गीत ब्रिटिशांच्या वसाहतवादी राजवटीविरोधातील आवाज बनले. ‘वंदे मातरम’च्या एकूण आठ कडव्यांपैकी फक्त दोन कडवीच काँग्रेसने स्वीकारली. या निर्णयावर मोदींनी टीका केली. १९५१ मध्येही ‘वंदे मातरम’च्या पहिली दोन कडवी स्वीकारून त्यांना दर्जा दिला गेला.
जेव्हा जेव्हा भारतावर संकट आले, तेव्हा देश ‘वंदे मातरम’च्या भावनेने पुढे गेला. आजही, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी सारख्याप्रसंगी, प्रत्येक घरात तिरंगा अभिमानाने फडकत असतो. अन्नसंकटाच्या काळात, ‘वंदे मातरम’च्या भावनेने शेतकऱ्यांना देशाच्या धान्याची कोठारे भरण्यास प्रेरित केले. जेव्हा जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला चिरडण्याचा प्रयत्न केला गेला, जेव्हा संविधानावर वार करण्यात आला आणि आणीबाणी लागू करण्यात आली, तेव्हा ‘वंदे मातरम’च्या शक्तीनेच राष्ट्राला उभे राहण्यास, त्यावर मात करण्यास सक्षम केले.
जेव्हा जेव्हा देशावर युद्धे लादली गेली, तेव्हा ‘वंदे मातरम’च्या भावनेने सैनिकांना सीमेवर खंबीरपणे उभे राहण्यास भाग पाडले आणि भारतमातेचा ध्वज विजयी होत राहिला. करोनाच्या जागतिक संकटाच्या काळातही, राष्ट्र त्याच भावनेने उभे राहिले, असे मोदी म्हणाले. काळ आणि स्वरूप बदलू शकतात, पण, महात्मा गांधींनी व्यक्त केलेली राष्ट्रएकतेची भावना आजही बळकट आहे, ‘वंदे मातरम’ आपल्याला एकत्र आणते, असेही मोदींनी नमूद केले.
राहुल-प्रियंका गैरहजर
मोदींचे लोकसभेत भाषण सुरू असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व खासदार प्रियंका गांधी-वढेरा हे दोघेही अनुपस्थित होते. त्यावरून भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी टीका केली. ‘वंदे मातरम’ ही एक ‘एनर्जी’ आहे, पण, काही लोकांसाठी ती ‘ॲलर्जी’ आहे. नेहरूंनी वंदे मातरमला फक्त दोन कडव्यांपुरते सीमित केले. आज दोघेही भाऊ आणि बहीण लोकसभेतून गायब आहेत, असे ठाकूर म्हणाले.
