वृत्तसंस्था, कोलंबो, नवी दिल्ली : श्रीलंकेत सुरू असलेल्या निदर्शने थांबवण्यासाठी तेथील सरकारने शनिवारी संध्याकाळी सहापासून सोमवार सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू केली आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांनी शुक्रवारी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. अध्यक्षांनी याद्वारे संशयितांना कुठल्याही खटल्याविना दीर्घकाळासाठी ताब्यात घेण्याचे अधिकार लष्कराला दिले आहेत. राजपक्षे यांना देशाची आर्थिक परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने त्यांनी पद सोडावे, अशी मागणी जोर धरत असून, तशी हिंसक निदर्शने होत आहेत. या पार्श्वभूमीवर ही आणीबाणी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, भारताने आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला तांदूळ निर्यात करणे सुरू केले आहे. दोन कोटी २० लाख लोकसंख्या असलेल्या श्रीलंकेस मोठय़ा आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. या देशातील परकीय गंगाजळी गेल्या दोन वर्षांत ७० टक्क्यांनी घटली असून, श्रीलंकेच्या चलनाचे प्रचंड अवमूल्यन झाले आहे. या देशाने आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचे साकडे घातले आहे.

भारतीय व्यापारांनी ४० हजार टन तांदूळ तातडीने श्रीलंकेस निर्यात करण्यासाठी दिला आहे. ही भारताने दिलेली अन्नधान्याची पहिली मोठी मदत आहे. श्रीलंकेत सध्या इंधनाचा तुटवडा असून, इंधन दर आकाशाला भिडले असल्याने जनतेत असंतोष आहे. तसेच येथे वीजपुरवठाही विस्कळीत झाला असून, १३ तास भारनियमन केले जात आहे. त्यामुळे सरकारविरोधी हिंसक निदर्शने सुरू आहेत. श्रीलंका सरकार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करणार आहे. परंतु हे परकीय कर्ज फेडण्याची क्षमता श्रीलंकेत सध्या तरी दिसत नाही.

इंडियन ऑईलकडून मदत

भारतीय तेल कंपनीची उपकंपनी ‘लंका आयओसी’ने शुक्रवारी सहा हजार मेट्रिक टन इंधन श्रीलंकेला पुरवण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेत सध्या इंधनाचा तुटवडा असून, इंधन दर आकाशाला भिडले असल्याने जनतेत असंतोष आहे.