Kolkata Emergency Landing: पश्चिम बंगालच्या कोलकाता विमानतळावर टर्कीश एअरलाईन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लँडींग करण्यात आले आहे. काठमांडूहून इस्तंबूलला जाणाऱ्या विमानाच्या उजव्या इंजिनात आग लागल्याचा संशय आल्यानंतर विमानाला आपत्कालीन परिस्थितीत कोलकात्यात उतरविण्यात आले. यानंतर विमानातील सर्व २३६ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काठमांडू ते इस्तंबूल प्रवास करणाऱ्या विमानाला आपत्कालीन परिस्थितीत विमानतळावर उतरण्याची परवानगी देण्यात आली. विमानाच्या कॅप्टनने कोलकाता एटीसीला सांगितले की, उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचा संशय आला होता. यानंतर दुपारी २ वाजून ४९ मिनिटांनी कोलकाता विमानतळावर लँडींग करण्यात आले.
कोलकाता विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानातील २२५ प्रवासी आणि ११ क्रू सदस्य सुस्थितीत असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. विमान अद्याप विमानतळावरच असून त्याची तांत्रिक तपासणी सुरू आहे.
इस्तंबूलला जाणाऱ्या THY-७२७ या विमानाने दुपारी १.२९ वाजता नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (TIA) उड्डाण केले. चार मिनिटांतच क्रूला उजव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे समजले. नेपाळच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाचे (CAAN) उपप्रवक्ते ज्ञानेंद्र भूल यांच्या मते, वैमानिकाने ताबडतोब काठमांडू टॉवरला माहिती दिली आणि सदर इंजिन बंद केले.
मुंबई विमानतळावरही विमान एकमेकांना घासले
मंगळवारी रात्री मुंबई विमानतळावरही दोन विमानांचे पंख एकमेकांना घासल्याची घटना घडलीहोती. मुंबई विमानतळावरील टॅक्सीवेवर एअर इंडिया आणि इंडिगो विमानांचे पंख एकमेकांना घासले गेले. एअर इंडियाच्या टेक-ऑफपूर्वी आणि इंडिगो विमानाच्या लँडिंगनंतर टॅक्सींगदरम्यान दोन्ही विमानांच्या पंखांचा परस्पर संपर्क झाला. या घटनेतही सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, असे निवेदन दोन्ही एअरलाइन्सही प्रसिद्ध केले.
एअर इंडिया आणि अजित पवारांच्या अपघातानंतर चिंता वाढल्या
जून २०२५ मध्ये अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर विमान वाहतुकीच्या सुरक्षेबाबतची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. विमान वाहतुकीबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही आपत्कालीन लँडींग करण्यात आली आहे.
२८ जानेवारी रोजी व्हीएसआर व्हेंचर्सद्वारे चालवले जाणारे लिअरजेट ४५ चार्टर विमान बारामती येथे लँडिंग करताना कोसळले. या अपघातात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) व्हीएसआर व्हेचंर्सची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

