Gorakhpur Woman Returns Home from Instagram Lover: उत्तर प्रदेशमध्ये अनेक विचित्र घटना घडल्याच्या बातम्या येत असतात. कधी सासू होणाऱ्या जावयाबरोबर पळ काढते, तर कधी नववधू दीराचा हात धरून जाते. याच पद्धतीचे आणखी एक प्रकरण उत्तर प्रदेशमध्ये घडलं आहे. गोरखपूरमधील एक ४० वर्षीय महिला आपल्या चार मुलांना टाकून इन्स्टाग्रामवर भेटलेल्या तरुणाबरोबर फरार झाली. मात्र अखेर चार मुलांनी भावनिक साद घालताच तिला पुन्हा घरी परतावं लागलं.
सदर महिला घर सोडून गेल्यानंतर तिच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत समजले की, महिलेची इन्स्टाग्रामवर एका २८ वर्षीय तरुणाशी ओळख झाली होती. दोघांनी अनेक दिवस एकमेकांशी चॅट केल्यानंतर महिलेनं स्वतःच्या कुटुंबाला सोडून त्याच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला.
एकेदिवशी अचानक महिला चार मुलं आणि पतीला सोडून २८ वर्षीय युवकाबरोबर फरार झाली. पतीच्या कुटुंबियांनी पत्नीचा बराच शोध घेतला मात्र ती सापडली नाही. काही दिवसानंतर जवळच एका परिसरात ती भाड्याच्या घरात राहत असल्याची माहिती पतीला मिळाली. यानंतर पती आपल्या चारही मुलांना घेऊन तिथे पोहोचला आणि पत्नीला घरी येण्याची विनंती करू लागला.
पती, मुलं आणि नातेवाईकांनी पत्नीला पुन्हा घरी परतण्याची विनंती केली असता सुरुवातीला महिलेनं नकार दिला. ती आता प्रियकराबरोबरच राहणार असल्याचे तिनं सांगितलं. यानंतर पोलिसही घटनास्थळी पोहोचले, त्यांनी दोन्ही पत्नी आणि तिच्या प्रियकराची समजूत काढली. दोन तासांच्या प्रयत्नानंतर पत्नीने पतीच्या घरी परतण्यास ती तयार असल्याचे सांगितले.
दरम्यान पोलीस समजूत घालत असताना महिलेच्या मुलांनी आपल्या आईला भावनिक साद घातली. यामुळे महिलेचे मन बदलले. आता महिला घरी परतल्यामुळे पोलिसांनीही या प्रकरणात कोणता गुन्हा दाखल केला नाही.
