२२ नोव्हेंबरला लखनऊ तर २८ ला मुंबईत, किसान मोर्चाची माहिती

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला २६ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने पुन्हा ‘किसान महापंचायतीं’वर भर दिला जाणार आहे व त्याद्वारे आंदोलनात जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. २२ नोव्हेंबरला लखनऊमध्ये, तर २८ नोव्हेंबरला मुंबईमध्ये महापंचायत भरवली जाणार असल्याची माहिती बुधवारी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आली.

संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबर रोज सुरू होत असून अधिवेशनाच्या काळात दररोज ५०० ट्रॅक्टरसह शेतकऱ्यांचा संसदेवर मोर्चा काढला जाणार असल्याचे शेतकरी संघटनांनी यापूर्वी जाहीर केले आहे. २६ नोव्हेंबर रोजी आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीच्या वेशींवर मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना जमवून मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. पण राज्या-राज्यांतही शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे अस्तित्व दाखवून केंद्र सरकारवर दबाव वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून त्यासाठी पुन्हा महापंचायती घेतल्या जाणार आहेत, असे संयुक्त किसान मोर्चाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने आझाद मैदानावर २८ नोव्हेंबर रोजी किसान महापंचायत आयोजित केली जाणार आहे. पुण्यातून २७ ऑक्टोबरपासून निघालेली लखीमपूर खेरी शहीद कलश यात्रा २७ नोव्हेंबर रोजी मुंबईत पोहोचणार आहे.

 मुंबईतील किसान महापंचायतीत शेतकरी आंदोलनातील राष्ट्रीय स्तरावरील नेते सहभागी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे यांनी दिली.