केवळ पत्नीशी भांडण झाले म्हणून एखाद्या कर्मचाऱ्याला पदोन्नती नाकारता येत नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.
न्या. डी. हरिपरनथामन यांनी सहायक लेखा अधिकारी ए. वेलुसामी यांची याचिका निकाली काढली. तामिळनाडू एनर्जी जनरेशन अँड डिस्ट्रीब्यूशन कार्पोरेशन या कंपनीत ते मुख्य अंतर्गत लेखा अधिकारी कार्यालयाच्या लेखा विभागात काम करीत आहेत. वेलुसामी यांनी असे म्हटले होते की, आपल्याला अंतर्गत लेखा अधिकारी म्हणून बढती नाकारण्यात आली व ती देण्याची सूचना न्यायालयाने संबंधित समितीस द्यावी.
न्यायालयाने म्हटले आहे की, जर पक्षकार व त्याच्या पत्नीचे भांडण झाले असेल तर ते बढती नाकारण्याचे कारण ठरत नाही. एका वेळी दोन बायका असण्याची खासगी तक्रार प्रलंबित असेल तरी बढती नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीची बढती रोखू नये.
संबंधित व्यक्तीने आपल्यावर हल्ला केला असा पत्नीचा आरोप आहे व त्यात एफआयआर दाखल असून चौकशी प्रलंबित आहे. घटस्फोटाचा दावाही तिरुचिरापल्ली न्यायालयात प्रलंबित आहे. त्याच्या पत्नीने वैवाहिक अधिकारांसंबंधी दाखल केलेली याचिका २३ डिसेंबर २०१० रोजी फेटाळण्यात आली आहे. नंतर तिने न्याय दंडाधिकाऱ्यांकडे खासगी तक्रार करून वेलुसामी याने आपल्याशी विवाह कायम असता दुसरा विवाह केला आहे.
त्यामुळे त्याला बढती देण्यात येऊ नये. वेलुसामी यांना १ ऑगस्ट २०११ रोजी निलंबित करण्यात आले व २३ जानेवारी २०१२ रोजी परत कामावर घेण्यात आले होते.
त्यांना वार्षिक पगारवाढ देण्यात आली नव्हती. एकदा कामावर परत घेतल्यानंतर पगारवाढ देणेही गरजेचे होते असे न्यायालयाने म्हटले आहे.