दारुबंदी असणाऱ्या बिहारमध्ये विधानसभा परिसरात दारुच्या बाटल्या सापडल्याने गदारोळ झाला आहे. बिहार विधानसभा परिसरात दारुच्या मोकळ्या बाटल्या आढलल्या असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरुन राजकारण रंगलं असून माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे आमदार तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दारुच्या बाटल्या सापडल्याने मुख्यमंत्र्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे असं ते म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा परिसरात दारुच्या मोकळ्या बाटल्या मिळाल्याची माहिती मिळताच तेजस्वी यादव घटनास्थळी पोहोचले होते. तेजस्वी यादव यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर केला आहे. हे आश्चर्यकारक असून मुख्यमंत्र्यांच्या चेंबरपासून काही पावलांच्या अंतरावर वेगवेगळ्या ब्रॅण्डची दारु उपलब्ध असल्याचं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

इतक्या कडक सुरक्षेत सुरु असलेल्या अधिवेशनादरम्यानही विधानसभेत दारु मिळत असेल तर उर्वरित बिहारची फक्त कल्पना करा असं म्हणत तेजस्वी यादव यांनी हे लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते असणाऱ्या तेजस्वी यादव यांनी या घटनेचा निषेध करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून संपूर्ण राज्यात पूर्णपणे दारुबंदी लागू करावं असं म्हटलं आहे. “हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. राज्यभरात दारुच्या बाटल्या सापत आहेत. दारुवर पूर्ण बंदी असली पाहिजे,” असं तेजस्वी यादव म्हणाले आहेत.

नितीश कुमारांनी दिली प्रतिक्रिया

नितीश कुमार यांनीदेखील हे गंभीर प्रकरण असल्याचं मान्य करताना याची चौकशी केली जाईल अशी माहिती दिली. “हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. याचा तपास होणं गरजेचं आहे. जर अध्यक्षांनी परवानगी दिली तर आम्ही मुख्य सचिव आणि डीजीपींना याचा तपास करायला सांगू शकतो,” असं नितीश कुमार म्हणाले आहेत.

दारुबंदीवरुन भिडले आमदार

बिहार विधानसभा हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र कामकाज सुरु होण्याआधीच दारुबंदीवरुन राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई वीरेंद्र आणि भाजपाचे आमदार संजय सरावगी यांच्यात वाद झाला. प्रकऱण इतकं वाढलं की राष्ट्रीय जनता दलाच्या आमदाराने भाजपा आमदाराला शिव्या देण्यास सुरुवात केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Empty liquor bottles found in bihar assembly premises tejashwi yadav demands cm nitish kumar resignation sgy
First published on: 30-11-2021 at 15:39 IST