Senator Bernie Sanders moves resolution against US Israel Military Aid: इस्रायलने तीन वर्षांपासून गाझा, वेस्ट बँक, इराण, लेबनॉन अशा मध्य पूर्वेतील देशांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये आजवर हजारो लोक मारले गेल्याची आकडेवारी समोर आली आहे. २८ फेब्रुवारीपासून इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर पुन्हा हल्ला केला आणि ४० हून अधिक दिवस सुरू असलेल्या या संघर्षामुळे जगासमोर संकट उभे राहिले. या युद्धखोरीविरोधात अमेरिकन जनता आणि सिनेटर आवाज उचलू लागले आहेत. अमेरिकेतील ज्येष्ठ राजकारणी आणि वरिष्ठ सिनेटर बर्नी सँडर्स यांचे सिनेटमधील ताजे भाषण गाजत आहे. ज्यात त्यांनी इस्रायलला केली जाणारी लष्करी मदत बंद करण्याचे आवाहन केले.
अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातून अमेरिकन सिनेटचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बर्नी सँडर्स यांनी इस्रायलला होणारी शस्त्रविक्री रोखण्याबद्दल चौथ्यांदा ठराव मांडला. यावेळीही हा ठराव बहुमताने फेटाळण्यात आला असला तरी डेमोक्रॅट्स आणि अपक्ष सिनेटरचा त्याला वाढता पाठिंबा इराण युद्धाविषयीचा वाढता असंतोष दाखवून देण्यासाठी पुरेसा आहे.
बर्नी सँडर्स यांनी २०२४ आणि २०२५ मध्येही असेच ठराव मांडले होते. त्यावेळीही ते फेटाळण्यात आले होते. मात्र दोन वर्षांत गाझा, इराण आणि लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या युद्धाखोरीविरोधात आता डेमोक्रॅट्स, अपक्ष सिनेटरचा विरोध वाढत चालला आहे. इस्रायलकडून अमेरिकेला होणारा बुलडोझर आणि बॉम्ब विक्रीवर बंदी घालणारे दोन ठराव सँडर्स यांनी मांडले होते. त्याला रिपब्लिकन सदस्यांनी विरोध केला. त्यांच्या विरोधामुळे दोन्ही ठराव ४०-५९ आणि ३६-६३ मतांनी फेटाळण्यात आले.

अमेरिकन करदात्यांचा पैसा वाया घालवू नका
अमेरिकन सिनेटमध्ये भाषण करत असताना सिनेटर बर्नी सँडर्स म्हणाले, “६० टक्के अमेरिकन नागरिक वेतनावर अवलंबून आहेत. त्यांना सध्या किराणा माल घेणे, घराचे भाडे भरणे, आरोग्यावर खर्च करणे आणि गॅसचे बिल भरणे अवघड झाले आहे. आपल्यावर ३७ ट्रिलियन डॉलरचे राष्ट्रीय कर्ज आहे. आता रिपब्लिकन असो, डेमोक्रॅट्स किंवा अपक्ष राजकारणी असो, पुराणमतवादी किंवा पुरोगामी नागरिक असो… हे सर्वच लोकांना वाटते की, करदात्यांचा पैसा जबाबदारीने हाताळला जावा. करदात्यांचे कोट्यवधी डॉलर्स नेत्यानाहूंच्या अवैध युद्धावर खर्च केले जाऊ नयेत, अशी भूमिका आता अमेरिकन नागरिक उघडपणे घेऊ लागले आहेत.”
आता बास झालं, हे सांगायची वेळ आली
७ ऑक्टोबर २०२३ पासून अमेरिकेने इस्रायलला २१ अब्ज डॉलर्सची लष्करी मदत इस्रायलला केली आहे, असेही बर्नी सँडर्स म्हणाले. याच दिवशी इस्रायल आणि हमासमध्ये संघर्ष सुरू झाला होता. हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी हल्ला करत १२०० लोकांना मारले होते. तर शेकडो लोकांचे अपहरण केले होते. सँडर्स यांनी सिनेटमध्ये पुढे म्हटले की, आता बास झाले, हे मोठ्याने आणि स्पष्टपणे बोलण्याची वेळ आली आहे. हमासने इस्रायलवर रानटी हल्ला केला, हे आम्ही मान्य करतो. पण याचा अर्थ असा नाही की, इस्रायलने आंतरराष्ट्रीय कायद्यांची मोडतोड करुन संपूर्ण पॅलेस्टिनला नेस्तनाबूत करावे, त्यांचा नरसंहार करावा.
पॅलेस्टाईनला नष्ट करण्याचा इस्रायलला अधिकार नाही
“गाझामध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून इस्रायलने ७२ हजार पॅलेस्टिनींचा नरसंहार केला. १ लाख ७० हजार लोक गंभीर जखमी झाले. पॅलेस्टिनच्या १० टक्के जनतेला प्राण गमवावे लागले आहेत. हेच जर अमेरिकेत झाले असते तर तीन कोटी लोक मारले गेले असते किंवा जखमी झाले असते. पॅलेस्टिनमधील पायाभूत सुविधा नष्ट करण्याचा, तिथल्या शाळा, रुग्णालये पाडण्याचा इस्रायलला कोणताही अधिकार नाही”, अशा शब्दांत बर्नी सँडर्स यांनी इस्रायलवर जोरदार टीका केली.
इतर सिनेटर काय म्हणाले?
कॅलिफोर्नियाचे सिनेटर ॲडम शिफ आणि ॲलेक्स पॅडिला यांनी सँडर्स यांच्या ठरावाच्या बाजूने मतदान केले. यापूर्वी त्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले होते, हे विशेष. मतदानानंतर त्यांनी संयुक्त निवेदन जाहीर केले. त्यात ते म्हणाले, “अमेरिका इस्रायलचा जवळचा मित्र आहे, पण याचा अर्थ असा नाही की, आपण इस्रायलचे सरकार किंवा पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सर्व निर्णयांना पाठिंबा द्याव. तसेच अमेरिकन राष्ट्रभक्त असण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाच्या प्रत्येक निर्णयाशी सहमत असायला हवे, असेही नाही.”

सिनेटर बर्नी सँडर्स कोण आहेत?
बर्नी सँडर्स हे अमेरिकेच्या व्हरमाँट राज्याचे २००७ पासून सिनेटमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत. सिनेटमध्ये येण्यापूर्वी ते १९९१ ते २००७ या काळात अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसचे सदस्य होते. तसेच १९८१ ते १९८९ या काळात त्यांनी बर्लिंगटन शहराचे महापौर म्हणून काम केले होते. अमेरिकन काँग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक काळ अपक्ष सदस्य राहिलेले ते एकमेव राजकारणी आहेत.
विचारसरणीबाबत बोलायचे झाल्यास बर्नी सँडर्स स्वतःला डेमोक्रॅटिक सोशालिस्ट मानतात. अमेरिकन जनतेला मोफत आरोग्य सेवा, मोफत शिक्षण मिळावे, अशी त्यांची जुनी मागणी आहे. तसेच श्रीमंतांवर अधिक कर लावून आर्थिक समानता आणावी, असेही त्यांचे मत आहे. हवामान बदलांबाबतही ते सजग असून त्यांनी ग्रीन न्यू डीलचे समर्थन केले आहे.
अमेरिकेतील तरुण पिढीमध्ये बर्नी सँडर्स प्रचंड लोकप्रिय आहेत. इंटरनेटवर त्यांचे मिम्स अनेकदा व्हायरल होत असतात. निवडणूक लढविण्यासाठी ते कॉर्पोरेट कंपन्यांकडून निधी घेण्याऐवजी आजही क्राऊड फंडिंगद्वारे निधी गोळा करतात, ही त्यांची विशेष ओळख आहे.
