एका २६ वर्षांच्या इंजिनिअरला अंमली पदार्थ देऊन लुटल्याची घटना समोर आलली आहे. डेटिंग अॅपवर भेटलेल्या महिलेने भेटायला आल्यानंतर या इंजिनिअरला अंमली पदार्थ मद्यातून दिले. त्याला गुंगी आल्यानंतर त्याचे पैसे आणि सोनं घेऊन महिला पसार झाली. ही घटना बंगळुरु या ठिकाणी घडली आहे. ही घटना १ नोव्हेंबरला घडली. मात्र इंजिनिअरने जेव्हा या प्रकरणी तक्रार दाखल केली तेव्हा प्रकाशात आली आहे.
नेमकी काय घटना घडली?
बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कविप्रिया नावाच्या एका महिलेने डेटिंग अॅपवर भेट झालेल्या इंजिनिअरला भेटायला बोलवलं होतं. मागील दोन महिन्यांपासून हे दोघंही ऑनलाइन एकमेकांशी संवाद साधत होते. यानंतर या दोघांनी भेटायचं असं ठरवलं. १ नोव्हेंबरला ही घटना घडली. इंदिरानगर या ठिकाणी एक रेस्तराँ आहे त्या ठिकाणी ही भेट ठरली होती. या ठिकाणी दोघांनी मद्य सेवन केलं, जेवण केलं. त्यानंतर हे दोघंही क्रिस्टल हाइट्स या ठिकाणी लॉजवर गेले. महिलेनेच ही रुम बुक केली होती. या महिलेने सांगितलं की ती एका ठिकाणी पीजी म्हणून राहते. त्या ठिकाणी तिने हे सांगितलं आहे की ती आज येणार नाही.
कविप्रिया नावाच्या महिलेने इंजिनिअरला लुटल्याची माहिती
कवीप्रिया नावाची महिला त्या इंजिनिअरला रुमवर घेऊन गेली. साधारण १२.३० च्या सुमारास त्यांनी जेवण मागवलं होहंत. त्यानंतर या महिलेने इंजिनिअरला पाणी प्यायला दिलं. पाणी प्यायल्यानंतर या इंजिनिअरला झोप लागली. सकाळी जेव्हा या इंजिनिअरला जाग आली तेव्हा त्याला कळलं की कविप्रिया तिथून पसार झाली आहे. तिने जाताना सगळ्या मौल्यवान वस्तू आणि पैसे घेऊन पोबारा केला आहे.
काय काय घेऊन पसार झाली महिला?
इंजिनिअरने दिलेल्या माहितीनुसार ३ लाख २२ हजारांची सोन्याची चेन, ३० ग्रॅमचं सोन्याचं ब्रेसलेट ज्याची किंमत ३ लाख ४५ हजार आहे. १० हजारांची रोख रक्कम आणि १२ हजार रुपयांचा हेडसेट असं सगळं घेऊन ती पसार झाली. पोलिसांनी सांगितलं की इंजिनिअरने या घटनेनंतर महिलेला त्याने फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण तिचा फोन सातत्याने स्विच ऑफ लागत होता. तरीही त्याने दोन दिवस वाट पाहिली. यानंतर या इंजिनिअरला ही भीती वाटली की त्याचे प्रायव्हेट फोटो तर काढले नाहीयेत ना? यानंतर त्याने थेट पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी कलम ३०३ (२) आणि कलम ३१८ (४) या अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे आणि या प्रकरणी तपास सुरु असल्याचंही सांगितलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
