प्रदूषणावरील अहवालाबाबत पर्यावरणमंत्री जावडेकर यांचा आरोप
जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच सादर केलेल्या प्रदूषणावरील अहवालात ३० भारतीय शहरांचा जागतिक पातळीवरील १०० अतिप्रदूषित शहरांच्या यादीत केलेला समावेश दिशाभूल करणारा आहे, असे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील आणि युरोपमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये हवेचे प्रदूषण किती आहे त्याची माहिती लवकरच भारत जाहीर करणार आहे, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले.
हवेचा दर्जा ठरविताना आरोग्य संघटनेने सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि बेन्झीन या महत्त्वाच्या प्रदूषक घटकांचा विचार केला नाही. पाश्चिमात्या देश केवळ भारत आणि अन्य देशांवरच का प्रकाशझोत टाकतात, आत्मपरीक्षण का करीत नाहीत, असे जावडेकर म्हणाले.
संघटनेचा अहवाल २०१२-१३मधील माहितीवर आधारित आहे, पीएम १० आणि पीएम २.५ यांचाच विचार करून दिल्ली हे शहर ११ अतिप्रदूषित असल्याचा अहवाल तयार करण्यात आला. त्यावर, हे योग्य चित्र नसल्याचा इशारा पर्यावरणवाद्यांनी दिला.
शहरे प्रदूषित आहेत हे केवळ पीएम २.५ वरून ठरविणे दिशाभूल करणारे आहे, अन्य महत्त्वाच्या घटकांचा आरोग्यावर परिणाम होत असतो, असे जावडेकर म्हणाले.
ओझोनचे प्रदूषण, बेन्झीनचे प्रदूषण, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रदूषण असे आठ महत्त्वाचे घटक आहेत, या सर्वाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. वेगवेगळ्या शहरांसाठी वेगवेगळे निकष आहेत, असेही ते म्हणाले.