Stray Dog Love Led Marital Dispute: एका ४१ वर्षीय पुरूषाने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेत क्रूरतेच्या आधारावर आपल्या पत्नीपासून घटस्फोट मागितला आहे. या व्यक्तीने असा आरोप केला आहे की, पत्नीने भटक्या कुत्र्यांना त्यांच्या घरात आणल्यामुळे त्याला त्रास झाला आहे. याचबरोबर त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याबद्दल पत्नीने केलेल्या एका प्रँक फोन कॉलमुळे त्याचा सार्वांसमोर अपमान झाला आहे.
पतीच्या याचिकेनुसार, या जोडप्याचे २००६ मध्ये लग्न झाले आहे. त्याच्या पत्नीने सोसायटीमध्ये पाळीव प्राण्यांना आणण्यास बंदी असूनही त्यांच्या घरात एक भटका कुत्रा आणला, ज्यामुळे त्यांच्यातील तणाव सुरू झाला. त्यानंतर पत्नीने फ्लॅटमध्ये आणखी भटके कुत्रे आणले. या कुत्र्यांसाठी त्याला अन्न बनवायला लावले आणि त्यांची स्वच्छताही करायला लावली. पतीने पुढे सांगितले की, जेव्हा त्याने एका कुत्र्याला त्यांच्या बेडवर झोपण्यासाठी विरोध केला, तेव्हा कुत्र्याने त्याला चावा घेतला.
पतीने या याचिकेत पुढे सांगितले की, घरात कुत्रे आणल्यामुळे शेजारी त्याच्या विरोधात गेले. यामुळे २००८ मध्ये शेजाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली. पतीने पुढे असा आरोप केला की, त्याच्या पत्नीने प्राणी हक्क संघटनेत सहभागी झाल्यानंतर वारंवार इतरांविरुद्ध पोलीस तक्रारी दाखल केल्या. तिला मदत करण्यासाठी त्याला ठाण्यात बोलावले असता, ठाण्यात जाण्यास त्याने नकार दिला यामुळे पत्नीने त्याला शिवीगाळ आणि अपमानित केले.
पतीने असा दावा केला आहे की, या तणावामुळे त्याचे लैंगिक आरोग्य बिघडले आणि त्याच्या लैंगिक शक्तीवर परिणाम झाला. त्याने असा आरोप केला की, १ एप्रिल २००७ रोजी त्याच्या पत्नीने त्याच्या कथित प्रेमसंबंधाबद्दल एका रेडिओ जॉकीकडून प्रँक कॉल करण्याची व्यवस्था केली, ज्यामुळे त्याची नोकरीच्या ठिकाणी आणि समाजात बदनामी झाली.
पतीने याचिकेत पुढे असेही सांगितले आहे की, तो पत्नीला कंटाळून बेंगळुरूला निघून गेला, पण तरीही त्याची पत्नी त्याचा छळ करत राहिली.
पतीने २०१७ मध्ये अहमदाबादच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला, परंतु पत्नीने पतीच आपल्याला सोडून गेल्याचा आणि त्यानेच तिला प्राण्यांच्या कार्यात सहभागी होण्याच प्रोहत्सान दिल्याचा युक्तिवाद केला. त्यावेळी पत्नीने, पती कुत्र्यांना मिठी मारताना आणि त्यांचे चुंबन घेताना घेतलेले फोटो सादर केले.
फेब्रुवारी २०२४ मध्ये, कौटुंबिक न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावत म्हटले की, “पुरावे पाहता, पत्नी त्याच्याशी क्रूरतेने वागली किंवा त्याला सोडून दिले हे सिद्ध करण्यात पती अपयशी ठरला आहे.” कथित विवाहबाह्य संबंधाबाबतच्या प्रँक कॉलबाबत न्यायालयाने म्हटले की, “घटस्फोट मागण्याचे हे कारण असू शकत नाही.”
दरम्यान, पतीने घटस्फोटानंतर पत्नीला १५ लाख रुपये पोटगी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर पत्नीने २ कोटी रुपयांचा आग्रह धरला आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने १ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवल्याचे सांगितले आहे.
