scorecardresearch

भारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान खान

अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय उपखंडातील आदरणीय नेते होते. भारत- पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले

भारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान खान
इम्रान खान (संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करणे हाच वाजपेयींचा खरा सन्मान ठरेल, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी दिल्लीतील ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’च्या (एम्स) रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी यांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये थेट लाहोरची बस यात्रा केली होती. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोक व्यक्त करत इम्रान खान पुढे म्हणाले, भारत- पाकिस्तानमध्ये राजकीय मतभेद आहे. पण दोन्ही देशांना सीमेवर शांतता हवी आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करणे हीच वाजपेयींसाठी खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.

अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय उपखंडातील आदरणीय नेते होते. भारत- पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि यासाठी ते सदैव स्मरणात राहतील, असेही त्यांनी म्हटले आहे. वाजपेयींच्या निधनाने दक्षिण आशियातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. इम्रान खान हे शनिवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-08-2018 at 11:51 IST