इथेनॉल आणि पेट्रोलचं मिश्रण असलेल्या इंधनाची निर्मिती करण्याकडे भारताचा कल हळूहळू वाढत आहे. भारताच्या इथेनॉल उत्पादन क्षमतेतही वाढ होताना दिसत आहे. मात्र, केंद्र सरकारच्या E20 इथेनॉल-मिश्रित पेट्रोल धोरणावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे. यातच आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा दावा केला होता.

केंद्र सरकार आता विमानाच्या इंधनातही (ATF) इथेनॉल मिसळण्याची योजना आखत असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे केंद्र सरकार खरंच विमानाच्या इंधनातही इथेनॉल मिसळण्याची योजना आखत आहे का? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता. मात्र, यावर केंद्र सरकारने खुलासा करत केजरीवालांचा तो दावा फेटाळून लावला आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी अरविंद केजरीवाल यांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया देत विमानाच्या इंधनात इथेनॉल मिसळण्याची कोणतीही योजना नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

राम मोहन नायडू यांनी काय खुलासा केला?

“विमानाच्या इंधनात इथेनॉल मिसळण्याची केंद्र सरकार योजना आखत असल्याचा दावा पूर्णपणे खोटा आणि बेजबाबदार आहे. असा कोणताही प्रस्ताव नाही. इथेनॉल आणि सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (SAF) या पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे त्याची अशा प्रकारे कोणतीही गल्लत करू केली जाऊ नये. विमानाचं इंधन हे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेनं (ICAO) मान्यता दिलेलं आणि जगभरात स्वीकारलेलं एक आंतरराष्ट्रीय प्रमाणित विमान इंधन आहे. त्याची कठोर चाचणी केली जाते, तसेच ते कडक जागतिक सुरक्षा मानकांची पूर्तता देखील करतं. विमान वाहतूक सुरक्षेबद्दल चुकीची माहिती पसरवल्याने प्रवाशांमध्ये अनावश्यक चिंता निर्माण होते. पण प्रवाशांची सुरक्षा हीच सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे”, असं मंत्री राम मोहन नायडू यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

केजरीवाल यांनी काय दावा केला होता?

केंद्र सरकारच्या E20 इथेनॉल-मिश्रित पेट्रोल धोरणावर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली होती. तसेच केंद्र सरकार आता टर्बाइन इंधनामध्ये इथेनॉल मिसळण्याची योजना आखत आहे. त्यामुळे विमानांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असं केजरीवाल यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं होतं. मात्र, केजरीवाल यांचा हा दावा केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे.

E20 पेट्रोलवरून ‘आप’चा मोर्चा

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या विरोधात मोर्चा काढला होता. या आंदोलनात आपचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं की, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊ नका आणि देशातील जनतेवर E20 पेट्रोल लादू नका. तसेच पेट्रोल पंपांवर ग्राहकांना E20 आणि सामान्य पेट्रोल यापैकी कोणतं इंधन घ्यायचं? याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा”, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली होती.