Ethanol Petrol Mileage Impact Hardeep Singh Puri Clarification: अमेरिका व इराण यांच्यात भडकलेल्या युद्धामुळे अवघ्या जगात कच्च्या तेलाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यापाठोपाठ पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांमुळे मोठी समस्या उभी ठाकली होती. या पार्श्वभूमीवर भारतात गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींकडून सातत्याने समर्थन केल्या जाणाऱ्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल-डिझेलचा मुद्दा चर्चेत आला. आता पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळून वापरलंदेखील जात आहे. मात्र, यावर अनेक आक्षेप घेण्यात येत आहेत. या इथेनॉलमिश्रित इंधनाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात असून त्यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

इथेनॉलमुळे मायलेज कमी होतं?

हरदीप सिंग पुरी यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना इथेनॉल मिश्रित पेट्रोल व त्याबाबत घेतल्या जाणाऱ्या शंकांबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी त्यावर भूमिका मांडली. “कुणीतरी म्हणालं की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे वाहनाचं मायलेज कमी होईल. पण आता तर हेही सिद्ध झालंय की इथेनॉल रेसिंग कार्समध्येदेखील वापरलं जातं. यामुळे अॅक्सलरेशन उत्तम होतं. मायलेजचाच मुद्दा असेल, तर ते काही प्रमाणात कमी होतं. पण यासाठी इतरही अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात”, असं ते म्हणाले.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वाहनांचा विमा नाही?

दरम्यान, इंधनात इथेनॉल मिश्रणाचा निर्णय सर्वांशी चर्चा करूनच घेतल्याचं ते म्हणाले. “यासंदर्भातील सर्व महत्त्वाच्या घटकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला आहे. यामध्ये SIAM आणि ARAI यांचादेखील समावेश आहे. मग कुणीतरी दावा केला की वाहनांच्या इन्शुरन्स कंपन्या इथेनॉल वापरणाऱ्या वाहनांसाठी सेवा पुरवत नाहीत. पण विमा कंपन्यांनी आधीच असं काहीही नसल्याचं स्पष्ट केलं आहे”, असं त्यांनी नमूद केलं.

गैरसमज पसरवतंय कोण? – हरदीपसिंग पुरी

“हे असे गैरसमज पसरवून कुणाचा फायदा होतो? मी कोणतेही आरोप करणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की. भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान एकाच वेळी अस्तित्वात असण्यासाठी मोठा वाव आहे. इथे इलेक्ट्रिक वाहनंही असू शकतात आणि दोन प्रकारच्या इंधनांवर चालणारीह वाहनंही असू शकतात. सध्या आपण फक्त २० टक्के इथेनॉल मिसळत आहोत. जर आपण २० टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला, तर तो सर्व महत्त्वाच्या चाचण्यांची पूर्तता झाल्यानंतरच होईल”, असं आश्वासन त्यांनी दिलं.

अनेक घटकांकडून इथेनॉलला विरोध

दरम्यान, एकीकडे इथेनॉल वापराबाबत केंद्र सरकार आग्रही असून, त्याबाबतचं धोरणदेखील चर्चेत असताना दुसरीकडे इथेनॉलला विरोध देखील केला जात आहे. इथेनॉल पॉलिसी मागे घेतली जावी, यासंदर्भात वेगवेगळे घटक मागणी करू लागले आहेत.