Ethiopia Volcano Eruption Updates: इथिओपियाच्या हायली गुब्बी परिसरात झालेल्या ज्वालामुखी उद्रेकाची सध्या जगभरात चर्चा पाहायला मिळत आहे. या उद्रेकानंतर खुद्द इथिओपियात वातावरणावर परिणाम झाला आहे. पण त्याचबरोबर ओमान व येमेन या देशांमधील वातावरणावरही त्याचा परिणाम झाला आहे. या ज्वालामुखी उद्रेकातून वर आलेल्या राखेचे, सल्फर डाय ऑक्साईडचे आणि मोठ्या प्रमाणावर काचेच्या तुकड्यांचे ढग तयार झाले असून ते शेकडो किलोमीटर लांब पसरू लागले आहेत. इथिओपियातून हे ढग येमेनमार्गे गुजरातमधून भारतात दाखल झाले असून संध्याकाळपर्यंत ते चीनच्या दिशेनं जातील, अशी माहिती समोर आली आहे. पण यादरम्यान बिघडलेल्या वातावरणामुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे.

इथिओपियामध्ये नेमकं काय घडलं?

इथिओपियाच्या पूर्वेकडच्या भागात रविवारी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. १० हजार वर्षांनंतर हा ज्वालामुखी पुन्हा जागृत झाल्याचं सांगितलं जात आहे. या ज्वालामुखीचा उद्रेक इतका प्रचंड होता की आकाशात तब्बल १४ ते १५ किलोमीटरपर्यंत उद्रेकातील राख आणि खडीच्या तुकड्यांचे लोळ उडाले. हा ज्वालामुखी अजूनही बाहेर येत असला, तरी त्याचं प्रमाण कमी होत आहे. मात्र, असं असलं तरी या लाव्हाचा उद्रेक झाल्यामुळे वर आलेल्या राखेच्या ढगांमुळे त्याचा आंतरराष्ट्रीय प्रभाव दिसू लागला आहे.

आधी ओमान आणि नंतर येमेनमधील हवाई वाहतूक प्रभावित झाल्यानंतर आता या राखेच्या ढगांमुळे भारतातील हवाई वाहतूक प्रभावित झाली आहे. गुजरातच्या पश्चिम सीमेवरून हे ढग भारतात दाखल झाले. त्यानंतर राजस्थान, दिल्लीमार्गे हिमालयीन पट्ट्यावरून हे ढग आज संध्याकाळी चीनच्या दिशेनं जातील. पण तोपर्यंत भारतीय विमान कंपन्यांनी काळजी घेण्याचे निर्देश DGCA नं दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक विमान कंपन्यांनी आपल्या उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.

कोणत्या विमान कंपन्यांच्या वेळापत्रकात झाले बदल?

Air India नं २४ व २५ नोव्हेंबर अशा दोन दिवसांमध्ये मिळून एकूण ११ विमान उड्डाणं रद्द केल्याची माहिती आपल्या ट्विटर हँडलवर दिली आहे.

२४ नोव्हेंबर

१. AI 106 – न्यूयॉर्क ते दिल्ली
२. AI 102 – न्यूयॉर्क (जेएफके) ते दिल्ली
३. AI 2204 – दुबई ते हैदराबाद
४. AI 2290 – दोहा ते मुंबई<br>५. AI 2212 – दुबई ते चेन्नई
६. AI 2250 – दम्मम ते मुंबई
७. AI 2284 – दोहा ते दिल्ली

२५ नोव्हेंबर

८. AI 2822 – चेन्नई ते मुंबई
९. AI 2466 – हैदराबाद ते दिल्ली
१०. AI 2444/2445 – मुंबई – हैदराबाद – मुंबई
११. AI 2472/2472 – मुंबई – कोलकाता – मुंबई

Indigo नं जारी केलं निवेदन, म्हणाले..

दरम्यान, एअर इंडियापाठोपाठ Indigo Airlines नंदेखील आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. “इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर राखेचे ढग हवाई हद्दीत पसरल्याचं समोर आलं आहे. भारतातदेखील हे ढग दाखल झाले आहेत. अशा वृत्तामुळे प्रवाशांना काळजी वाटू शकते याची आम्हाला कल्पना आहे. प्रवाशांची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब असल्याची खात्री प्रवाशांनी बाळगावी. आमच्या टीम परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असून आंतरराष्ट्रीय संघटनांच्याही संपर्कात आहेत. समोर उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत”, असं इंडिगोनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. तसेच, प्रवाशांना लागेल ती सर्व मदत व माहिती पुरवण्यासाठी इंडिगोचे कर्मचारी सज्ज असल्याचंदेखील त्यांनी नमूद केलं.

या पोस्टमध्ये विमानांच्या वेळापत्रकातील बदल इंडिगोनं दिलेले नसले, तरी आपली वेबसाईट goindigo.com वर जाऊन प्रवाशांना त्यांच्या विमानाच्या वेळापत्रकासंदर्भात माहिती मिळेल, अशी प्रतिक्रिया एका कमेंटवर इंडिगोकडून देण्यात आली आहे.

Akasa Air कडून प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री

अकासा एअरलाईन्सकडूनदेखील विमान उड्डाणासंदर्भात निवेदन जारी करण्यात आलं आहे. “इथिओपियामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीवर अकासा एअरलाईन्स व्यवस्थापनाचं बारीक लक्ष आहे. या परिस्थितीत आसपासच्या भागात विमान उड्डाणांवर होणाऱ्या परिणामांवरदेखील अकासा एअरलाईन्सचं लक्ष आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणासंदर्भातील मार्गदर्शक नियमावलींचं पालन करत प्राप्त परिस्थितीचा आमची पथकं आढावा घेत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना घेतल्या जात आहेत”, असं निवेदन अकासा एअरलाईन्सनं आपल्या एक्स अकाऊंटवर जारी केलं आहे.

याच ट्वीटवर आपल्या नियोजित प्रवासाच्या वेळांबाबत प्रवाशांकडून कमेंटमध्ये केलेल्या प्रश्नांना अकासा एअरलाईन्सकडून उत्तरं दिली जात आहेत.

SpiceJet कंपनीचं प्रवाशांना आवाहन

दरम्यान, स्पाईसजेट विमान कंपनीनं दुबईला जाणाऱ्या किंवा दुबईहून येणाऱ्या प्रवाशांना विशेष आवाहन केलं आहे. या मार्गांनी स्पाईसजेटच्या विमानांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कंपनीच्या संकेतस्थळावर आपल्या विमानाच्या वेळेबाबत होणाऱ्या बदलांकडे लक्ष ठेवावं, असं आवाहन स्पाईसजेट कंपनीनं केलं आहे.