Ethiopia Hayli Gubbi Volcano Eruption: रविवारी इथिओपियाच्या हायली गुब्बी भागात ज्वालामुखीचा प्रचंड मोठा उद्रेक झाला. या उद्रेकातून निघालेला लाव्हारस आणि राख आकाशात तब्बल १५ किलोमीटर वरपर्यंत गेल्याचं दिसून आलं. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. लाव्हारस उद्रेकाचं भीषण रूप पाहून नेटिझन्समध्ये भीतीयुक्त प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच आता या उद्रेकाचा फटका भारताला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण इथिओपियाच्या ज्वालामुखी उद्रेकातून निघालेली राख ढगांच्या स्वरूपात वातावरणात पसरली असून सोमवारी संध्याकाळी हे राखेचे प्रचंड ढग गुजरात व राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत!

हवाई वाहतूक संचलनालयाचे सतर्कतेचे निर्देश

राखेचे हे ढग राजस्थानमधून पुढे दिल्ली आणि नंतर हिमालयाच्या दिशेनं सरकण्याचा अंदाज अवकाश निरीक्षण केंद्रांकडून वर्तवण्यात आला आहे. हे राखेचे ढग ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने प्रवास करत भारतात दाखल झाले आहेत. इथिओपियातील ज्वालामुखीचा उद्रेक आता हळूहळू कमी होत असला, तरी हे राखेचे ढग मात्र अवकाशात अनेक समस्या निर्माण करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ओमन आणि येमेनमधून प्रवास करत हे ढग भारतात येऊन धडकले आहेत. या देशांपर्माणेच भारतातदेखील सर्व विमान कंपन्यांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.

ज्वालामुखी उद्रेकातून तयार झालेले हे ढग प्रामुख्याने उद्रेकातील राख, सल्फर डाय ऑक्साईड, काच आणि बारीक खडीने बनले आहेत. जमिनीपासून १० हजार ते २५ हजार फुटांच्या उंचीवरून हे ढग प्रवास करत आहेत. काही ठिकाणी हे अंतर ४५ हजार फुटांपर्यंत वर आहे. या पार्श्वभूमीवर प्रवासी वा लष्करी विमानांच्या उड्डाणांवेळी सतर्कतेच्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश DGCA नं दिले आहेत. राखेचे ढग पसरलेल्या भागातून किंवा उंचीवरून विमानांचे उड्डाण करू नये, असे निर्देश डीजीसीएने दिले आहेत. तसेच, विमानांचे मार्ग, विमानातील इंधनाचा साठा, केबिनमधील धूर वा धुळीचा शिरकाव, इंजिनची कार्यक्षमता या बाबींची योग्य ती काळजी घेण्याचेही निर्देश दिले आहेत.

१० हजार वर्षांनंतर झाला ज्वालामुखीचा उद्रेक

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, इथिओपियाच्या हायली गुब्बी भागात याआधी सुमारे १० हजार वर्षांपूर्वी अशा प्रकारे ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. तेव्हापासून शांत असलेला लाव्हा रविवारी झालेल्या उद्रेकामुळे वाहू लागला. यामुळे इथिओपियासह ओमान व येमेनमधील विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक विमानं रद्द करण्यात आली असून काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानांचाही समावेश आहे.

भारतीय विमान वाहतुकीवरही परिणाम

दरम्यान, गुजरातमार्गे भारतात प्रवेश केलेल्या राखेच्या प्रचंड मोठ्या ढगांमुळे भारतातील हवाई वाहतुकीवरही परिणाम दिसून येत आहे. उदाहरणार्थ, सोमवारी कन्नूरहून अबुधाबीला जाणारं इंडिगोचं विमान अहमदाबादला वळवण्यात आलं. इंडिगोसह एअर इंडिया व अकासा एअरलाईन्सनंदेखील विमानं रद्द होण्याची, विलंबाने उड्डाण होण्याची वा मार्ग बदलले जाण्याची पूर्वकल्पना प्रवाशांना दिली आहे.

ज्वालामुखीच्या उद्रेकातून वर आलेली राख विमानांच्या इंजिनमध्ये बिघाड होण्यास कारणीभूत ठरू शकते. परिणाम मोठा असल्यास विमान कोसळण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. विमानाच्या इंधनसाठ्याच्या भागात किंवा सेन्सर्समध्येदेखील या राखेच्या कणांमुळे बिघाड होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर डीजीसीएनं सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी राखेचे ढग जमा झालेल्या हवाई हद्दीतून जाणाऱ्या किंवा आलेल्या विमानांची काळजीपूर्वक तपासणी करण्याचे निर्देश DGCA नं दिले आहेत.

DGCA च्या विमान कंपन्यांना सूचना…

१. ज्वालामुखीच्या राखेमुळे प्रभावित झालेल्या हवाई हद्दीत किंवा त्या उंचीवर विमान उड्डाणे टाळा.

२. प्राप्त परिस्थितीत विमान उड्डाणाचे मार्ग बदलणे, इंधन साठ्यासंदर्भात सतर्क राहणे याची काळजी घ्या.

३. विमानाच्या तपासणीवेळी कुठेही ज्वालामुखीतून निघालेल्या राखेचं अस्तित्व जाणवल्यास तातडीने डीजीसीएला कळवा.

४. राखेचे ढग असणाऱ्या हद्दीतून उड्डाण केल्यानंतर संबंधित विमानाची पूर्ण तपासणी करा.

५. विमानाच्या इंजिनची कार्यक्षमता, त्यातील नादुरुस्ती यांची वेळोवेळी काळजीपूर्वक तपासणी करा.

६. विमानाच्या केबिनमध्ये धूर किंवा राखेचे प्रमाण आढळल्यास त्यावर त्वरीत कार्यवाही करा.

७. विमान उत्पादन कंपनीकडून पुरवण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं तंतोतंत पालन करा.