Ethiopian Ambassador on Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर ही मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. दरम्यान, भारताच्या या मोहिमेचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे. काही देश भारताचं समर्थन करण्यासाठी पुढे येत आहेत.
पूर्व आफ्रिकेतील एका देशाने म्हटलं आहे की “भारताने पाकिस्तानात जाऊन हल्ला केला नाही, उलट पाकिस्तानमधील दहशतवादी भारतात घुसले आणि त्यांनी समस्या निर्माण केली”. इथियोपियाचे भारतातील राजदूत फेसेहा शॉवेल गेब्रे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
गेब्रे यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरलं आहे. गेब्रे केवळ पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवून थांबले नाहीत तर त्यांनी या हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तराचं कौतुक केलं आहे. गेब्रे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत केली. तेव्हा त्यांनी त्यांची रोखठोक मतं मांडली.
पाकिस्तानमधील दहशतवादी भारतात आले, हे भयंकर व अस्वीकार्य आहे : गेब्रे
फेसेहा शॉवेल गेब्रे म्हणाले, “भारताने पाकिस्तानात जाऊन हल्ला केला नव्हता. पाकिस्तानमधील दहशतवादी भारतात आले होते. हे खूपच भयंकर आणि अस्वीकार्य आहे. त्यांनी धर्माच्या आधारावर लोकांचं वर्गीकरण करून त्यांना ठार मारलं. ज्याप्रमाणे भारत सध्या दहशतवादाशी दोन हात करतोय, त्याचप्रमाणे इथियोपिया देखील पूर्व आफ्रिकेतील दहशतवादाविरोधात संघर्ष करतोय. भारताचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ मे महिन्याच्या अखेरिस इथियोपियाला येणार आहे. या शिष्टमंडळातील लोक भारताची बाजू मांडतील.
पाकिस्तानमधील दोन दहशतवाद्यांनी काश्मीरमधील त्यांच्या दोन सहकाऱ्यांना बरोबर घेत २२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरच्या पहलगाममधील पर्यटन स्थळी दाखल होत तिथल्या पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यामध्ये नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती चालू आहेत. मात्र भारतीय लष्कराने त्यांना प्रत्येक वेळी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.