युरोपीय समुदायाने युक्रेनवर प्रवास व संपत्ती गोठवण्याचे र्निबध जारी केले आहेत, असे इटलीच्या परराष्ट्र मंत्री एम्मा बोनिनो यांनी सांगितले. सोविएत रशियाच्या विघटनानंतर सर्वात मोठा हिंसाचार युक्रेनमध्ये पोलीस व निदर्शक यांच्या धुमश्चक्रीत झाला असून त्याने अनेक लोक मारले गेले आहेत.
युरोपीय समुदायाच्या राजनैतिक अधिकारी असलेल्या एम्मा यांनी सांगितले की, युक्रेनमध्ये आणखी नेमके काय घडते यावर निर्बंधांची पुढील यादी अवलंबून राहील पण युक्रेनवर र्निबध राहणार हे आता निश्चित झाले आहे. २८ देशांच्या या समुदायाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अशी कारवाई करण्यास मान्यता देताना कुठली राजकीय वचनबद्धता दाखवली आहे. हिंसाचार, मानवी हक्क उल्लंघन, बळाचा जादा वापर करणाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम उद्यापासून सुरू केले जाईल. जखमी बंडखोरांना वैद्यकीय मदत व व्हिसा देण्याची तयारी युरोपीय समुदायाने दर्शवली आहे.
फ्रान्स, जर्मनी, पोलंड या देशांचे परराष्ट्र मंत्री अनुक्रमे लॉरेंट फॅबियस, फ्रँक वॉल्टर स्टेमनर व रोडोस्लॉ सिकोरस्की यांनी कीव येथे झालेल्या बैठकीत र्निबधाचा निर्णय घेतला. तिघांनीही अध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच व तीन विरोधी पक्षनेत्यांशी अनेक तास चर्चा केली. ब्रुसेल्स येथे झालेल्या एका बैठकीत राजनीतीज्ञांनी दंगलविरोधी उपकरणे निर्यात करण्यावर र्निबध घातले आहेत. र्निबधांची अंमलबजावणी लगेचच सुरू करण्यात येईल, असे बोनिनो यांनी सांगितले.