वृत्तसंस्था, ब्रुसेल्स : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाबाबत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढे काय होणार याबाबत स्पष्टता होईपर्यंत अमेरिका-युरोपीय महासंघ (ईयू) व्यापार कराराची अंमलबजावणी स्थगित आली आहे, असे अधिकार्यांनी सोमवारी सांगितले.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेले अवाजवी आयात शुल्क बेकायदा ठरवले आहे. त्यापूर्वी, युरोपीय महासंघ आणि अमेरिकेच्या व्यापार करारामध्ये ईयू’वर १५ टक्के आयातशुल्का लागू करण्याबद्दल सहमती झाली होती. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी वेगळ्या कायदेशीर अधिकारांचा वापर करून जगातील अनेक देशांवर १५ टक्के शुल्क पुन्हा लागू केले. हे शुल्क आधीपासून असलेल्या करांवर अतिरिक्त असल्याने युरोपमधील अनेक उत्पादकांसाठी प्रत्यक्ष शुल्कदर करारातील मर्यादेपेक्षा जास्त ठरत आहे.
युरोपीय महासंघाच्या संसदेचे जर्मन सदस्य आणि आंतरराष्ट्रीय व्यापार समितीचे अध्यक्ष बर्न्ड लांगे यांनी सांगितले की, ‘अनेक उत्पादनांवर प्रत्यक्ष शुल्क आता जुन्या करारातील १५ टक्क्यांपेक्षा बरेच वाढले आहे.’ मंगळवारी अमेरिकेबरोबर करारावर मतदान होणे अपेक्षित होते; मात्र परिस्थिती स्पष्ट नसल्याने समितीने ते पुढे ढकलले.
लांगे यांनी उदाहरण देताना सांगितले की युरोपियन चीज विशेषत: परमेसन आणि कॅमेम्बर्ट यावर आधीच १५ टक्के आयात शुल्क होते. व्यापार करारानुसार हे शुल्क १५ टक्क्यांवर मर्यादित राहणार होते. पण नव्या १५ टक्के अधिभारामुळे एकूण शुल्क जवळपास ३० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. याशिवाय ट्रम्प सध्या वापरत असलेला कायदेशीर उपाय केवळ १५० दिवसांसाठी लागू आहे. त्यानंतर तो वाढवण्यासाठी अमेरिकेच्या काँग्रेसची मंजुरी आवश्यक राहील, त्यामुळे भविष्यात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षांची पुन्हा चिडचिड
- वॉशिंग्टन : अमेरिकेच्या व्यापार भागीदार देशांनी, अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन डावपेच खेळण्याचा प्रयत्न केला तर आपण त्यांच्या जास्त आयातशुल्क आकारू असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दिला.
- शुक्रवारी न्यायालयाच्या निकालानंतर ट्रप्प यांनी सरसकट
१० टक्के आयातशुल्क लागू करण्याची घोषणा केली. दुसर्या दिवशी त्यात बदल करून त्यांनी १५ टक्के आयातशुल्क आकारणार
असल्याचे जाहीर केले. - दुसरीकडे, अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्भवलेल्या अनिश्चिततेनंतर द्विपक्षीय व्यापार कराराच्या मसुद्यासाठी वॉशिंग्टनमध्ये सोमवारपासून सुरू होणारी वाटाघाटी प्रतिनिधी बैठक भारताने पुढे ढकलली.
- त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या समाजमाध्यमावर लिहिले की, ‘‘विशेषत: ज्या देशांनी अनेक वर्षे अमेरिकेचे नुकसान केले, त्यांच्यावर अतिरिक्त आणि अलीकडेच मान्य केलेल्या आयाकशुल्कापेक्षा जास्त आयातशुल्क लादले जाईल.’’
