scorecardresearch

भारताच्या महिन्याच्या आयातीएवढे तेल युरोप रशियाकडून अर्ध्या दिवसात घेतो!

‘रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून शस्त्रपुरवठय़ाचे नवे मोठे करार करू नयेत, असे आवाहन आम्ही सर्व देशांना करत आहोत,’ असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी पत्रकार परिषदेत केले.

वॉशिंग्टनमधील द्विमंत्रिस्तरीय बैठकीनंतर जयशंकर यांची स्पष्टोक्ती; अमेरिकेचे भारताला रशियाबरोबर शस्त्रकरार न करण्याचे आवाहन

नवी दिल्ली, वॉशिंग्टन : ‘रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून शस्त्रपुरवठय़ाचे नवे मोठे करार करू नयेत, असे आवाहन आम्ही सर्व देशांना करत आहोत,’ असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी पत्रकार परिषदेत केले. तर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रशिया-युक्रेन युद्धप्रश्नी भारताच्या भूमिकेबाबत बोलताना स्पष्ट केले, की भारत रशियाकडून महिनाभरात जेवढे खनिज तेल आयात करतो, तेवढे खनिज तेल युरोपीय देश रशियाकडून रोज दुपापर्यंत म्हणजे अर्ध्या दिवसात आयात करतात.

वॉशिंग्टनमध्ये भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विमंत्रिस्तरीय बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही परराष्ट्रमंत्री बोलत होते. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले, की तुमचा रोख भारत रशियाकडून करत असलेल्या खनिज तेल आयातीला अनुषंगून आहे. परंतु, तुम्ही या संदर्भात युरोपकडे लक्ष द्यायला हवे. भारत त्याच्या उर्जेच्या गरजेनुसार व गरजेपुरतेच खनिज तेल रशियाकडून आयात करतो. परंतु उपलब्ध आकडेवारी पाहता भारताची रशियाकडून महिनाभरात होणारी तेल आयात युरोपीय देशांना अवघ्या अर्ध्या दिवसात केलेल्या आयातीपेक्षाही कमी आहे. त्यामुळे आपण त्या वास्तवाचाही विचार अवश्य करावा.

भारताने युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियाचा निषेध का केला नाही, असे विचारले असता जयशंकर यांनी सांगितले, की भारताने संयुक्त राष्ट्र संघटना, संसद आणि इतर व्यासपीठांवर युक्रेनप्रश्नी कोणती भूमिका घेतली, हे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी आता निदर्शनास आणले. कुठल्याही संघर्षांला भारताचा विरोधच आहे. संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे प्रश्न सोडवावेत, अशीच आमची भूमिका आहे. हा संघर्ष व हिंसाचार तातडीने बंद व्हावा, अशीच भारताची भूमिका आहे. त्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्याची भारताची तयारी आहे.

भारताने रशियाकडून एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली घेतली तेव्हा अमेरिकेच्या निर्बंधविषयक कायद्यानुसार आम्ही अद्याप निर्बंध अथवा सवलत देण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असे स्पष्ट करून अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले, आम्ही सर्व देशांना आवाहन करतो, की रशियाशी कोणतीही सुरक्षाप्रणाली अथवा शस्त्रखरेदीचे मोठे करार करू नयेत. भारत-रशिया मैत्रीचा मोठा इतिहास आहे. त्यात लष्करी सहकार्य अंतर्भूत आहे. अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेची भारताशी संरक्षणादी क्षेत्रांत फारशी भागीदारी नसताना रशियाशी भारताची मैत्री होती.  मात्र, आता अमेरिका भारताशी संरक्षणविषयक भागीदारीस अनुकूल आहे.

‘भारतातील मानवाधिकार पायमल्लीकडे अमेरिकेचे लक्ष’

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी केलेल्या काही विधानांनी सर्वाच्या भुवया उंचावल्या. हे विधान त्यांनी आपले सहकारी व अमेरिकेचे लॉईड ऑस्टिन यांच्यासह अमेरिका भेटीस आलेले भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत केल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. ब्लिनकेन म्हणाले, की आम्ही मानवी हक्क व लोकशाही मूल्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहोत. भारताशीही या मुद्दय़ांवर आमचा नियमित संवाद असतो. या संदर्भात भारतात अलिकडे घडणाऱ्या काही चिंताजनक घटनांकडे आमचे लक्ष आहे. भारतातील काही राज्यांतील सरकार, पोलीस आणि तुरुंगाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानवी हक्कांची पायमल्ली सुरू आहे, त्याबाबत आम्हाला चिंता वाटते. त्यांनी यावेळी बाकी तपशील दिला नाही. मात्र, लोकशाहीवादी राष्ट्रांनी मानवी हक्कांकडे विशेष लक्ष देण्याच्या धोरणाबरहुकूम त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली असावी, असे तज्ञांचे मत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Europe consumes india imports oil russia meeting outspokenness appeal ysh

ताज्या बातम्या