युरोपमध्ये उष्णतेची लाट आली असून लाखो नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळातील या उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या फ्रान्समध्ये तापमान दिवस-रात्र उच्च पातळीवरच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या देशात तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळवण्याच्या प्रयत्नात असताना ४० जणांचा पाच दिवसांत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे.

फ्रान्सच्या राष्ट्रीय हवामान विभागाने (मेटिओ फ्रान्स) देशातील ५४ भागांना म्हणजेच जवळपास निम्म्या देशाला उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. इटली, स्पेन आणि ब्रिटनलाही या उष्णतेच्या लाटेचा फटका बसत आहे. ही तीव्र उष्णतेची स्थिती या आठवड्याच्या अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, अनेक शहरांमध्ये दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

‘तापमानाचे आणखी काही उच्चांक नोंदले जाण्याची शक्यता आहे. यात पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढणार्‍या तापमानाचाही समावेश असू शकतो,’ असेही ‘मेटिओ फ्रान्स’ने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या हवामानविषयक संस्थेच्या अंदाजानुसार, पुढील पाच वर्षांत उष्णतेचे आणखी अनेक विक्रम मोडले जाण्याची शक्यता आहे.

शाळा बंद, रेल्वे सेवेवर परिणाम

ब्रिटन, स्पेनमध्ये उष्णतेची लाट आली आहे. ब्रिटनमध्ये, हवामान विभागाने बुधवार आणि गुरुवारसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. जूनमधील दैनंदिन तापमानाचा आतापर्यंतचा उच्चांक मोडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर अनेक शाळा बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच येथील रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे.