Jet Fuel Shortage : अमेरिका-इराण युद्धाचे जगावर कसे गंभीर परिणाम होत आहेत, याबाबत आता माहिती समोर येऊ लागली आहे. गेल्या एक महिन्यांपासून सुरू असलेलं अमेरिका-इराण युद्ध ८ एप्रिल रोजी तात्पुरतं थांबलं असलं तरी हे युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही. ८ एप्रिल रोजी फक्त युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. मात्र, अद्यापही अमेरिका-इराणमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव आहे. होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीच्या अमेरिकेच्या भूमिकेचा जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होत आहे.

एकीकडे शांतता करारासाठी पाकिस्तानच्या माध्यमातून चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दररोज वेगवेगळी वक्तव्य करून इराणला धमकीवजा इशारा देत आहेत. त्यामुळे अमेरिका-इराण युद्ध कधी संपणार? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक व्यापाराला अडथळे निर्माण होत असल्याने याचे गंभीर परिणाम आता समोर येत आहेत. या युद्धाचा फटका फक्त आखाती देशांनाच नाही तर युरोपलाही बसत आहे.

युरोपमध्ये एअरलाईन्सच्या सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. युरोपमध्ये फक्त ६ आठवड्यांचा जेटसाठी लागणारा इंधनाचा साठा शिल्लक राहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अमेरिका-इराण युद्धाचा जगावर नेमकी कसा परिणाम होतोय? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

युरोपमध्ये विमान वाहतूक उर्जा संकटाच्या उंबरठ्यावर?

मध्यपूर्वेतील युद्धाचा जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रावर गंभीर परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. युरोपमध्ये जेट इंधनाच्या संभाव्य तुटवड्याची भीती वाढली असून जेट इंधनाचा पुरवठा कमी होत असल्याने आणि त्यामध्ये सातत्याने व्यत्यय येत असल्याने युरोपमधील विमान वाहतूक संकटाच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा देण्यात आला. अमेरिका- इराणमधील युद्ध थांबलं नाही आणि इंधनाचे टँकर मध्य-पूर्वेतून सुरळीतपणे बाहेर पडू शकले नाही, तर युरोपमध्ये लवकरच विमानसेवा चालवण्यासाठी इंधनाची कमतरता भासण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या प्रमुखांनी काय इशारा दिला?

आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या (International Energy Agency) प्रमुखांनी गुरुवारी याबाबत अतिशय गंभीर इशारा दिला. युरोपकडे फक्त ६ आठवडे पुरेल एवढाच जेट इंधनसाठा शिल्लक आहे. असोसिएटेड प्रेसला गुरुवारी दिलेल्या मुलाखतीत आयईएचे (IEA) कार्यकारी संचालक फातिह बिरोल यांनी इशारा देताना म्हटलं की, “होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.”

युरोपियन विमान कंपन्यांनी देखील इराण युद्धामुळे काही आठवड्यांत जेट इंधनाच्या तुटवड्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे याचा फटका विमान कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे. रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, युरोप इतर कोणत्याही वाहतूक इंधनापेक्षा जेट इंधनाच्या आयातीवर जास्त अवलंबून आहे. त्यापैकी जवळपास ७५ टक्के आयात ही मध्य-पूर्वेतून होते. मात्र, सध्या मध्य-पूर्वेतच तणावाची परिस्थिती असल्याने याचा युरोपवर गंभीर परिणाम होत असल्याचं दिसत आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार, ‘रायनएअर’ या युरोपियन एअरलाईन्सने सांगितलं की, त्यांचे पुरवठादार त्यांना फक्त मे महिन्यांपर्यंतच पुरेसं जेट इंधन पुरवण्याची हमी देत आहेत. जर होर्मुझ सामुद्रधुनीतून जागतिक व्यापार सुरळीत झाला नाही तर इंधनाचा तुटवडा भासू शकतो. इराण युद्ध लवकर संपलं, तर जेटच्या इंधनाच्या पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येणार नाही, असं या एअरलाइनने म्हटलं.

इंधन संकटाचा सामना करण्यासाठी युरोप काय निर्णय घेणार?

होर्मुझमार्गे वाहतूक होणाऱ्या जेट इंधनाचा युरोप सर्वात मोठा ग्राहक आहे. पण आता युरोपियन युनियन संभाव्य जेट इंधन पुरवठ्याच्या तुटवड्याचा सामना करण्यासाठी रिफायनरी उत्पादन वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी हालचाल करत आहे.

अमेरिका-इराण युद्धाचा युरोपवर कसा परिणाम होतोय?

युरोपमधील विमान कंपन्यांसाठी उन्हाळा हा सर्वाधिक फायद्याचा असतो. कारण या काळात प्रवाशांची संख्या वाढते. मात्र, अमेरिका-इराण युद्धाचा युरोपमधील विमान कंपन्यांवर मोठा परिणाम होत आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने एका अहवालात म्हटलं की, “युरोपियन बाजारपेठांमध्ये मागणीचा उच्चांक गाठला असताना मध्य पूर्वेकडून होणारी आयात थांबल्याने एक गंभीर लॉजिस्टिकल आव्हान निर्माण झालं आहे.” तसेच ” होर्मुझची सामुद्रधुनी इंधन वाहतुकीसाठी बंद राहिली, तर तीन आठवड्यांत ऊर्जा तुटवडा निर्माण होऊ शकतो”, असा इशारा काही विमान कंपन्यांनी दिला. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत इराण युद्ध संपलं नाही तर युरोपमधील विमान वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही.