Pahalgam Terror Attack News Updates: भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन करणाऱ्या युरोपियन युनियनच्या सर्वोच्च राजदूत काजा कल्लास यांना सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. याचबरोबर अनेकांनी त्यांच्या पहलगाम आणि युक्रेनबाबतच्या ‘दुहेरी भूमिके’वर टीका केली आहे. दरम्यान एक्सवर त्यांनी संयम बाळण्याबाबत केलेल्या पोस्टमध्ये कुठेही जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही, ज्यामध्ये २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.

भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन करणाऱ्या एक्स पोस्टमध्ये काजा कल्लास यांनी म्हटले आहे की, “भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव चिंताजनक आहे. मी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि तणावाची परिस्थिती शांत करण्यासाठी संवाद साधण्याचे आवाहन करते. तणाव वाढवल्याने कोणाचेही भले होत नाही. हा संदेश देण्यासाठी मी आज भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशक दर यांच्याशी चर्चा केली आहे.”

परराष्ट्र धोरण तज्ञ आणि अनेक सोशल मीडिया युजर्सनी काजा कल्लास यांच्या दुटप्पीपणावर टीका केली, रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाबद्दलच्या त्यांच्या भूतकाळातील विधानांना पुन्हा उजाळा दिला. ज्यामध्ये त्यांनी “संरक्षण म्हणजे चिथावणी नाही” असे प्रतिपादन केले होते आणि “आक्रमकांना थांबवण्याची” गरज असल्याचे म्हटले होते.

युरोपने असा विचार करणे थांबवावे की…

एका युजरने काजा कल्लास यांच्यावर टीका करताना म्हटले की, “एस जयशंकर बरोबर म्हणाले होते, युरोपने असा विचार करणे थांबवावे की, युरोपच्या समस्या जागतिक समस्या आहेत, पण जागतिक समस्या युरोपच्या समस्या नाहीत. १९८८ पासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे काश्मीरमध्ये ७०,००० हून अधिक लोकांचे प्राण गेले आहेत. अलिकडेच २६ निष्पाप पुरुषांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले, त्यानंतर पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली. पाकिस्तान सर्वात घातक दहशतवादी संघटनांचे घर आहे आणि तरीही तुम्ही डोळेझाक करत आहात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काजा कल्लास यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना आणखी एक युजर म्हणाला की, “नमस्कार ढोंगी काजा, तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या. हे युरोप नाही. हा भारत आहे. आम्ही आमच्यासाठी जे महत्वाचे आणि आवश्यक आहे ते करू.”