पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मन यांनी शनिवारी आम आदमी पार्टीच्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीतील कामगिरीबद्दल भाष्य केलं आहे. गुजरातमध्ये आपला केवळ पाच जागांवर विजय मिळवता आला आहे. याचसंदर्भात मान यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी, “अगदी (विराट) कोहलीही प्रत्येक सामन्यामध्ये शतक करत नाही,” असं उत्तर दिलं आहे.

गुजरातमध्ये आपचं सरकार येईल असा दावा आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. याच दाव्यासंदर्भात भगवंत मान यांनी ‘अजेंडा आज तक २०२२’ या विशेष कार्यक्रमातील मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, “केजरीवाल यांच्याकडे किमान एवढी हिंमत तरी आहे की त्यांनी ही गोष्ट कागदावर लिहून दिली होती. आम्ही काँग्रेसरप्रमाणे मैदान सोडून पळालो नाही. उलट आम्ही लढलो. आम्ही पंजाबमधून आता गुजरातमध्ये प्रवेश केला आहे. आता आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे,” असं मान यांनी म्हटलं.

supriya sule marathi news, goa cm pramod sawant marathi news
“सुप्रिया सुळे घरातील वादात अडकल्याने काहीही बोलतात”, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले…
Rahul Kaswan Congress candidate attacks BJP
दिल्लीमध्ये मोदी अन् चुरूमध्ये देवेंद्र, मध्येच राजेंद्र; काँग्रेस उमेदवाराचा भाजपावर हल्लाबोल
gadchiroli lok sabha seat, Minister dharamraobaba aatram, Claims, vijay waddetivar will join bjp, waddettiwar denies
विजय वडेट्टीवार यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश! धर्मरावबाबा आत्राम यांच्या दाव्याने खळबळ
Chaudhary Birendra Singh from Haryana rejoined Congress
हरियाणामध्ये भाजपला धक्का; प्रभावी जाट नेते ब्रिजेंद्र सिंह यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

‘आप’ला १३ टक्के मतं मिळाल्याचंही मान यांनी नमूद केलं. “आमच्या या ठिकाणी शून्य जागा होता तिथून आम्ही पाचपर्यंत आलो आहोत. अगदी (विराट) कोहलीही प्रत्येक सामन्यामध्ये शतक करत नाही. त्यामुळे आमचा पराभव झालेला नाही,” असं पंजाबचे मुख्यमंत्री असलेल्या मान यांनी सांगितलं. मान यांनी भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष्य केलं. भाजपाने तीनपैकी केवळ एक निवडणूक जिंकली आहे, असा टोला मान यांनी लागवला. “भाजपाचा हिमाचल प्रदेशमध्ये आणि दिल्ली महानगरपालिका निवडणुकीमध्ये पराभव झाला,” असं मान म्हणाले.

नक्की वाचा >> “तू खरोखरच…”; घरच्याच लोकांनी विरोधकाचा प्रचार करुनही BJP च्या तिकीटावर पत्नीने विजय मिळवल्यानंतर रविंद्र जडेजाची खास पोस्ट

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी ‘आप’चा जन्म हा भ्रष्टाचारविरोधी मोहिमेतून झाल्याची आठवण करुन दिली. “हा पक्ष इतर पक्षामधून आलेल्या व्यक्तीने स्थापन केलेला नाही. हा पक्ष सर्वसामान्यांमधून उभा राहिला आहे आणि पक्षाला देशाची सेवा करायची आहे. आम आदमी पार्टीचा जन्म भ्रष्टाचारविरोधी मोहिमेतून झाला आहे. हा पक्ष रामलिला मैदानात जन्माला आला आहे,” असं मान यांनी म्हटलं.

गुजरातमध्ये सलग अडीच दशकांहून अधिक काळ सत्तेवर असलेल्या भाजपाने गुरुवारी ऐतिहासिक यश संपादन केले. राज्यात सलग सातव्यांदा विजय साकारणाऱ्या भाजपाने गेल्या निवडणुकीत कडवी झुंज देणाऱ्या काँग्रेसला भुईसपाट केले आणि पहिल्यांदाच संपूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाला एक आकडी जागांवरच रोखले. गुजरातमध्ये १९९५ पासून सलग २७ वर्षे सत्तेत राहिलेल्या भाजपाने १९८५ मधील काँग्रेसच्या माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखालील १४९ जागांचा विक्रम मोडित काढला. सुमारे ५३ टक्के मतांसह विक्रमी १५६ जागा मिळवणाऱ्या भाजपाने या निकालाद्वारे पश्चिम बंगालमधील डाव्यांच्या सात कार्यकाळांच्या  विक्रमी राजवटीशी बरोबरी साधली. गुजरातमध्ये ३१ प्रचारसभा घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा भाजपाच्या या यशाने अधोरेखित केला.

गुजरातमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपाला दोन अंकी जागांवर रोखण्यात यश मिळवलेल्या काँग्रेसचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला. गेल्या वेळी ७७ जागा जिंकलेल्या या पक्षाला यावेळी केवळ १७ जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीत प्रचाराचा धडाका उडविणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी ‘भारत जोडो’ यात्रेलाच पसंती देत मोजक्याच प्रचारसभा घेतल्या. पक्षश्रेष्ठींनी फारसा प्रचार केलेला नसला तरी १२५ जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसला मिळालेल्या १७ जागा हा पक्षाचा आतापर्यंतचा नीचांक ठरला. वाढती महागाई, बेरोजगारी या मुद्यांबरोबरच काँग्रेसने प्रचारात केलेल्या आठ घोषणाही भाजपाच्या लाटेत निष्प्रभ ठरल्या. काँग्रेसला केवळ २८ टक्के मते मिळाली असून, गेल्या वेळच्या तुलनेत त्यात १३ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

या निवडणुकीत सर्वशक्तिनिशी उतरलेल्या आम आदमी पक्षाला खाते उघडता आले असले तरी चमकदार कामगिरी करता आली नाही. दिल्ली, पंजाबपाठोपाठ गुजरातमध्ये सत्ता मिळवण्याचे आम आदमी पक्षाचे स्वप्न धुळीस मिळाले. मात्र, पक्षाला पाच जागांसह १३ टक्के मते मिळाली असून, पक्षाला गुजरातमधील कामगिरीमुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आम आदमी पक्षाने काँग्रेसच्या मतांना खिंडार पाडल्याचे चित्र दिसले.