देशातील मुस्लिम सामुदायाच्या स्थितीवरून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात. अनेकदा नेते आणि सेलिब्रेटी चिंता देखील व्यक्त करतात. याचदरम्यान, एका मुस्लीम स्कॉलरने दावा केला आहे की, भारतात मुस्लीम लोकांना इस्लामिक काम करण्यासाठी जितकं धार्मिक स्वातंत्र्य मिळतं, तितकं स्वातंत्र्य इतर कोणत्याही देशात मिळत नाही. मुस्लीम स्कॉलर पोनमाला अब्दुलखदेर मुसलियार यांनी भारताचं कौतुक केलं आहे.
मुसलियार हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) एका सुन्नी मुस्लीम संघटनेशी संबंधित आहेत. मुसलियार म्हणाले की, “आखाती देशात देखील मुस्लीम सामुदायाला इस्लामिक कामं करण्यासाठी जितकं स्वातंत्र्य मिळत नाही जितकं भारतात सहज मिळतं.”
पोनमाला अब्दुलखदेर मुसलियार संपूर्ण केरळ जाम-इय्याथुल उलमाचे (कांथापुरम एमपी अबूबकर मुसलियार खंड) सचिव आहेत. ते रविवारी कोझिकोडेमधील एपी खंडाच्या सुन्नी स्टुडंट्स फेडरेशनच्या बैठकीत बोलत होते. ते म्हणाले की, “तुम्ही जेव्हा जगभरातील वेगवेगळे देश पाहता तेव्हा लक्षात येतं की, भारतासारखा दुसरा कोणताही देश नाही. इस्लामिक कामं करण्यासाठी इथं पूर्ण स्वातंत्र्य मिळतं. आखाती देशांमध्ये देखील इतकं स्वातंत्र्य मिळत नाही.”
“भारतासारखा दुसरा कोणताही देश नाही”
मुसलियार म्हणाले की, “मलेशियासारख्या पूर्वेकडील देशांमध्ये देखील आपल्याला इस्लामी कामं करण्याचं धार्मिक स्वातंत्र्य मिळत नाही. आपण भारतात जी संघटनात्कमक कामं करत आहोत ती इतर कुठे शक्य होतील का? इस्लामिक कामांसाठी भारतासारखा दुसरा कोणताही देश नाही.”
हे ही वाचा >> भारत जोडो यात्रेचा आज समारोप समारंभ, शिवसेनेसह १२ पक्ष सहभागी होणार, ‘या’ ५ पक्षांना निमंत्रण नाही
भारतीय संविधानाची ताकद
सुन्नी खंड आययूएमएल नेतृत्वाने पोनमाला मुसलियार यांच्या वक्तव्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘इस्लामिक कामं करण्याचं स्वातंत्र्य ही आपल्या संविधानाची ताकद आहे.” आययूएमएलचे प्रदेशाध्यक्ष सैय्यद सादिक अली शिहाब थंगल म्हणाले की, “येथील मुस्लीम सामुदायाला देशात कोणत्याही प्रकारच्या धोक्याचा सामना करावा लागत नाही, कारण या देशाचं संविधान खूप मजबूत आहे.”