Mount Everest Sherpa Alive After 6 days in Death Zone News: माउंट एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान अनेकदा मृत्यूच्या दाढेतून गिर्यारोहक परत आल्याच्या कथा आपण ऐकतो, पण नेपाळमध्ये निसर्गाचा एक असा अद्भूत चमत्कार घडला आहे ज्यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. एव्हरेस्टवर बेपत्ता झाल्यानंतर मृत घोषित करण्यात आलेला एक नेपाळी शेर्पा (मार्गदर्शक) तब्बल ६ दिवसांनंतर बर्फातून रांगत सुरक्षित परत आला आहे.
विशेष म्हणजे, तिकडे काठमांडूमध्ये त्याच्या घरी कुटुंबीयांनी त्याला मृत समजून अंत्यसंस्काराचे धार्मिक विधीही सुरू केले होते. अनेकांनी तर त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहणारे व्हिडिओही पोस्ट केले होते .’द गार्डियन’ने या थक्क करणाऱ्या घटनेचे वृत्त दिले आहे.
हिलरी दावा शेर्पा असे या मृत्यूला चकवा देणाऱ्या गिर्यारोहकाचे नाव आहे. २९ मे रोजी जगातील सर्वोच्च शिखर सर करून खाली उतरत असताना ७,५०० मीटर (२४,६०० फूट) उंचीवरील ‘कॅम्प ३’ च्या वर ते शेवटचे दिसले होते. मात्र, त्यानंतर त्यांचा इतर सहकाऱ्यांशी संपर्क तुटला आणि ते बेस कॅम्पवर पोहोचू शकले नाहीत, अशी माहिती बीबीसीच्या वृत्तात देण्यात आली होती.
‘डेथ झोन’मधून जिवंत परतणे अशक्यच
हिलरी दावा शेर्पा ज्या भागात बेपत्ता झाले होते, तो एव्हरेस्टचा ‘डेथ झोन’ म्हणजेच मृत्यूचा सापळा मानला जातो. या अत्यंत उंचीवरील भागात हवेचा दाब कमालीचा कमी असतो आणि ऑक्सिजनची पातळी इतकी खालावलेली असते की माणसाला जिवंत राहणे अशक्य होते. त्यामुळेच, इतके दिवस या भागात अडकल्यानंतर दावा शेर्पा जिवंत असतील अशी आशा त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि रेस्क्यू टीमने पूर्णपणे सोडली होती.
बर्फातून रांगत येत असताना अचानक दिसले…
नेपाळच्या गिर्यारोहण क्षेत्रात या घटनेला थेट ‘चमत्कार’ म्हटले जात आहे. या शोध मोहिमेचे समन्वय पाहणारे ‘८के एक्स्पेडिशन्स’चे कार्यकारी संचालक पेम्बा शेर्पा यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी एका सपोर्ट टीमला हिलरी दावा शेर्पा खुंबू आइसफॉल जवळील बर्फाच्छादित उतारावरून बेस कॅम्पच्या दिशेने रांगत येताना दिसले.
त्यांच्या हाताला फ्रॉस्टबाइट (अतिथंडीमुळे त्वचा आणि ऊती गोठणे) झाले होते, पण त्यांची प्रकृती समाधानकारक होती. त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवून अन्न आणि पाणी देण्यात आले.
घरी अंत्यसंस्काराचे विधी सुरू, तितक्यात बातमी आली!
बेस कॅम्पवर प्रथमोपचार केल्यानंतर दावा शेर्पा यांना हेलिकॉप्टरने काठमांडूतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे, त्यांच्या घरी अत्यंत भावूक वातावरण होते. दावा यांच्या निधनाची बातमी समजल्यामुळे त्यांची पत्नी दामू शेर्पा आणि मुलगी मेंडो ल्हामु शेर्पा यांनी घरात बौद्ध परंपरेनुसार अंत्यसंस्काराचे विधी सुरू केले होते. हा विधी अनेक दिवस चालतो आणि त्यातील दुसरा दिवस सुरू असतानाच त्यांना दावा जिवंत असल्याची बातमी मिळाली.
“आम्हाला स्थानिक वृत्तवाहिन्यांवरून पहिल्यांदा समजले की ते जिवंत आहेत. पण आमचा विश्वासच बसत नव्हता. आम्ही तो व्यक्ती आमचे वडीलच आहेत ना, याची खात्री करण्यासाठी आधी त्यांचे फोटो मागवले. फोटो पाहिल्यानंतर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला,” अशी प्रतिक्रिया त्यांची मुलगी मेंडो हिने दिली.
त्या दिवशी नेमके काय घडले होते?
दावा शेर्पा यांचे सहकारी गिर्यारोहक ख्रिस थ्रॉल यांनी तर दावा यांच्या निधनाची खात्री मानून त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहणारा व्हिडिओही पोस्ट केला होता.
थ्रॉल यांनी सांगितले की, “खाली उतरत असताना दावा एका ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले होते. मी त्यांना विचारले, ‘हिलरी, तू ठीक आहेस ना भावा?’ त्यावर ते म्हणाले, ‘हो, मी ठीक आहे, ख्रिस तू पुढे निघ.'” दावा यांच्याकडे सॅटेलाइट फोन आणि रेडिओ होता, पण ते काम करत होते की नाही याबद्दल शंका होती. त्याच वेळी थ्रॉल यांना एक पोलंडचा गिर्यारोहक गंभीर अवस्थेत सापडल्याने ते त्याला वाचवण्यासाठी पुढे निघून गेले. हवामान अत्यंत वेगाने बदलत होते आणि कडाक्याची थंडी होती. दावा अनुभवी असल्याने ते स्वतः मार्ग काढत येतील, असा थ्रॉल यांचा अंदाज होता, पण नंतर दावा बेपत्ता झाले.
यंदाच्या मोसमातील गर्दी आणि मृत्यूचे सावट
यंदाच्या मे महिन्यात जगातील सर्वोच्च शिखरावर चढाई करण्यासाठी रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. हजारहून अधिक गिर्यारोहक आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी एव्हरेस्ट सर केले. मात्र, यंदाचा मोसम अत्यंत आव्हानात्मक ठरला असून आतापर्यंत ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही दिवसांपूर्वीच भारताच्या हैदराबाद येथील अरुण कुमार तिवारी आणि त्यांचे सहकारी संदीप आरे या दोन भारतीय गिर्यारोहकांचाही एव्हरेस्टवर मृत्यू झाला होता. तिवारी यांचे डोंगरावरील प्रेम पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह तिथेच निसर्गाच्या सानिध्यात ठेवण्याचा निर्णय घेतला, तर आरे यांचा मृतदेह खाली आणण्यात यश आले होते. या पार्श्वभूमीवर, मृत्यूच्या दारातून ६ दिवसांनंतर जिवंत परतलेले हिलरी दावा शेर्पा यांचे पुनरागमन खरोखरच थक्क करणारे आहे.
