Iran Aircraft In Pakistan: पाकिस्तान इराणच्या लष्करी विमानांना देशात आश्रय देत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. अमेरिकेच्या या आरोपात तथ्य असल्याचे आता समोर आले आहे. याप्रकरणी समोर आलेले काही सॅटेलाईट फोटो आणि व्हिडीओ, पाकिस्तान अमेरिकेला अंधारात ठेवून इराणला मदत असल्याची शंका खरी असल्याचे म्हणण्यास वाव निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्या संघर्षात पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका बजावत आहे. शांततेसाठी प्रयत्नशील असल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानने मात्र इराणला मदत केल्याचे वृत्त फेटाळले आहे.
व्हिडीओ, फोटो समोर
युद्ध सुरु असताना इराणी लष्करी विमानं पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर उभी करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे केवळ युद्ध सुरु असतानाच नव्हे तर त्यापूर्वी देखील इराणी लष्करी विमानं पाकिस्तानी एअरबेसवर उभी असल्याचे उघड झाले आहे. जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झालेला एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओच्या हवाल्याने एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. इराणी हवाई वाहतूक आणि इंधन भरणारी विमानं कराची विमानतळावर उभी असल्याचे दिसत आहे. इस्रायलने इराणविरोधात राबविलेल्या ऑपरेशन रायझिंग लायननंतर ही विमानं पाकिस्तानमध्ये पार्क केल्याचे सांगितले जात आहे.
पाकिस्तानी एअरबेसवर इराणी विमानं
पाकिस्तान इराणी विमानांना आश्रय देत असल्याचे वृत्त सीबीएस वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले होते. यानंतर आता पाकिस्तानमध्ये असलेल्या इराणी विमानांचे व्हिडीओ आता समोर येऊ लागले आहेत. यामुळे शांतता चर्चेत मध्यस्थी असणाऱ्या पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सीबीएसच्या वृत्तानुसार समोर आलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये नूर खान विमानतळावर इराणी विमानं उभी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यात इराणी हवाई दलाचे आरसी-१३०एच स्पष्टपणे दिसत आहे.
गेल्यावर्षीच्या युद्धानंतर विमानं केली पार्क
संशोधक डामेन सायमन यांनी देखील पाकिस्तानच्या विमानतळावर उभ्या असणाऱ्या इराणी विमानाची खातरजमा केली आहे. “११ आणि १२ एप्रिल २०२६ रोजी इराणी विमानं नूर खान एअरवेसवर दाखल झाली आणि १२ मे २०२६ पर्यंत ती विमानतळावरच होती”, असा दावा सायमन यांनी केला आहे. दरम्यान, याबाबत अमेरिकेचे पीट हेगसेथ यांनी बोलताना आम्ही दुसरा मध्यस्थी शोधू असे सांगितले. शिवाय अशीही चर्चा पुढे जात नसल्याचे मत त्यांनी मांडले.
पाकिस्तानने फेटाळला दावा
दरम्यान, गेल्या वर्षी इस्रायलविरुद्ध संघर्ष सुरु असताना इराणी लष्करी विमानं पाकिस्तानमध्ये पार्क करण्यात आल्याचा व्हिडीओही आता समोर आल आहे. यात कराची विमानतळवर इराणी केसी-७४७ आणि केसी -७०७ पार्क असल्याचे दिसून येते. दरम्यान, सीबीएसचे वृत्त समोर आल्यानंतर पाकिस्तानकडून इराणी लष्करी विमानं पार्क असल्याचा दावा फेटाळून लावला. वृत्तात करण्यात आलेला दावा निराधार आणि दिशाभूल करणार आहे, असे स्पष्टीकरण पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे.
