पश्चिम बंगालमधील ईव्हीएम (EVM) छेडछाड आणि निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी एका स्थानिक न्यायालयाने तृणमूल काँग्रेसचे (TMC) माजी खंबीर नेते जहांगीर खान यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जहांगीर खान हे टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांचे माजी निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी गेल्या महिन्यात फलता येथील फेरनिवडणुकीतून आपले नाव मागे घेतले होते.
न्यायालयाचा निर्णय आणि वकिलांचा नकार
पश्चिम बंगाल पोलिसांनी न्यायालयात जहांगीर खान यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावत ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. यासोबतच, तपासासाठी आरोपीला राज्याबाहेर किंवा इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्यायचे असल्यास तपास अधिकाऱ्यांनी स्वतंत्र अर्ज सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
या संपूर्ण घडामोडीत एक मोठी कायदेशीर नाट्यमयता पाहायला मिळाली. डायमंड हार्बर बार असोसिएशनच्या एकाही वकिलाने जहांगीर खान यांचे प्रतिनिधित्व करण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी खान यांना सरकारी कायदेशीर मदतीची मागणी करावी लागली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत त्यांना सरकारी वकील नियुक्त करून दिला आहे.
नेपाळ सीमेवरून अटक
पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्य दलाने (STF) जहांगीर खान यांना नेपाळ सीमेजवळून अटक केली होती. त्यांच्यावर दक्षिण २४ परगणा मतदारसंघात भाजपच्या निवडणूक चिन्हावर पट्टी लावून ईव्हीएम मशीनशी छेडछाड केल्याचा आणि मतदारांना धमकावल्याचा गंभीर आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर अनेक एफआयआर (FIR) दाखल आहेत.
निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
बंगालमधील एकूण २९४ जागांपैकी २९३ जागांचे निकाल ४ मे रोजी जाहीर झाले होते. मात्र, निकाल लागण्याच्या अवघे ४८ तास आधी निवडणूक आयोगाने फलता विधानसभा मतदारसंघातील मतदान रद्द करून तिथे पूर्णपणे फेरमतदान घेण्याचे आदेश दिले होते. मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज गायब असणे आणि विरोधकांच्या चिन्हांची छेडछाड झाल्याचे चौकशीत समोर आल्यानंतर आयोगाने हे पाऊल उचलले होते.
‘सिंघम’ विरुद्ध ‘पुष्पा’ वाद
जहांगीर खान हे निवडणुकीपूर्वी त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे प्रचंड चर्चेत आले होते. निवडणूक आयोगाचे पोलीस निरीक्षक अजय पाल शर्मा (जे ‘सिंघम’ म्हणून ओळखले जातात) यांनी खान यांच्या घरी जाऊन मतदारांना न धमकावण्याचा इशारा दिला होता. याला आव्हान देत खान यांनी, “ते जर सिंघम असतील, तर मी ‘पुष्पा’ आहे,” अशी घोषणा केली होती. मात्र, आता या ‘पुष्पा’ला पोलिसांनी गजाआड केले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
